Thane Crime | एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची चाकूने ८ वार करून हत्या, आई समोरच घडला प्रकार | पुढारी

Thane Crime | एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची चाकूने ८ वार करून हत्या, आई समोरच घडला प्रकार

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वेकडील तिसगांव परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या आई समवेत घरी येत असताना सोसायटीच्या आवारातच एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने ७ ते ८ वार केले. हा प्रकार तिच्या आई समोरच घडला. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्‍यु झाला. या हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. या गोंधळात आरोपीने फिनेल पिऊन स्‍वत:ला संपवण्याचा प्रयत्‍न केला. घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसानी आरोपीला ताब्यात घेत त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आदित्य कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. (Thane Crime)

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आदित्य कांबळे काही दिवसांपासून पाठलाग करत तिला छेडत होता. मात्र ती मुलगी त्याला दाद देत नव्हती. घडलेला प्रकार तिने आईला सांगितल्यानंतर तिची आई नेहमी तिच्यासोबत असायची. रविवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आई बरोबर ही तरुणी घरी जात असताना आदित्य हा सोसायटीच्या आवारात तिची वाट पाहत थांबला होता. आई बरोबर सोसायटीच्या आवारात ही तरुणी पोचताच त्याने हातातील चाकूने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, हल्ल्यानंतर सोसायटी मधील नागरिकांनी पकडून आरोपीला पोलिसांच्या ताब्‍यात दिले. तर गोंधळाचा फायदा घेत आरोपीने बरोबर आणलेले फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला तातडीने उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या रस्त्याने जाणाऱ्या तरुणीला फरपटत नेत बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. तर गुन्हेगार कोयत्याचा धाक दाखवत नागरिकांना धमकावत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटना नंतर शहरात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Thane Crime)

-हेही वाचा 

परभणी : डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत

नवीन शैक्षणिक धोरणानुसारच यंदा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम

जामखेड : नागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त नामसाप्ताहास प्रारंभ

Back to top button