नवीन शैक्षणिक धोरणानुसारच यंदा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम | पुढारी

नवीन शैक्षणिक धोरणानुसारच यंदा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नावीन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करून शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पाटील म्हणाले, भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे.

राज्यात तंत्रशिक्षण विभाग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सध्याच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करून शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासून प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्या-टप्प्या पूर्णपणे विकसित करण्यात येईल.

तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात करण्यात येत असून, एकूण 49 एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमाकरिता प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने के स्किम या नावाने संबोधले जाणार आहे.

हा अभ्यासक्रम परिणाम आधारित क्रेडिट सिस्टिमवर आधारित असणार आहे. यामध्ये प्रत्येक सत्र हे 20 ते 22 क्रेडिटचे असून, एकूण सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम हा 120-132 क्रेडिटचा असणार आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षणामध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या 6 आठवड्यांचा कालावधी वाढवून आता 12 आठवड्यांचा करण्यात येत आहे, डिजिटल मीडियाचा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता योग आणि ध्यानसाधना या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, भारतीय ज्ञानपरंपरा विविध विषयांमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधान या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधीसुद्धा अधिक उपलब्ध होतील, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. मोहितकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Delhi School : शिक्षकाची सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण; मुलगा रुग्णालयात दाखल; दिल्लीच्या सरकारी शाळेतील घटना

कमावता नाही, तरीही सक्षम पती म्हणून विभक्त पत्नीला पोटगी द्यावी लागेल, मुंबई कोर्टाचा निर्णय

Back to top button