परभणी : डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत | पुढारी

परभणी : डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत

सेलू (परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : शेतकऱ्यांना नियमित व सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध व्हावा , सिंचनाचे क्षेत्र वाढावे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून पीएम कुसुम योजनना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ मिळवून दिला. तालुक्यातील डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यावेळी कंपनीचे संचालक मेहुल शहा, सीईओ गोपाल काबरा, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट मॅनेजर अंकुश जाधव ,बालाजी कराडकर, एरिया मॅनेजर शशिकांत शिंदे आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील डुघरा येथील मनोज शिंदे या तरुणाने मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअर म्हणून शिक्षण पूर्ण केले. बारावीत शिक्षण घेत असलेला आपला भाऊ विनोद शिंदे यांना सोबत घेऊन जीके एनर्जी या कंपनीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

कुसुम सौर कृषी पंप योजना जिल्ह्यात राबवत असताना, योजनेतील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली. मागील तीन महिन्यात कंपनीने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करताना सदरील योजनेद्वारे जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सोय उपलब्ध झाली. त्याशिवाय कंपनीचे उद्दिष्ट देखील पूर्ण झाले. त्यामुळे कंपनीमार्फत मनोज शिंदे व विनोद शिंदे यांचा थायलंड मधील बँकॉक येथे उत्कृष्ट कामगिरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र शिंदे बंधूंचे स्वागत होत आहे.

महाराष्ट्रातील 19 जणांचा गौरव

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध असताना देखील, महावितरणच्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे तसेच तांत्रिक बिघाडीमुळे शेतकऱ्यांना बागायती अपेक्षित उत्पन्न घेता येत नाही. शेतकऱ्यांचे बागायती उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने कुसुम सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत ०३ एचपी च्या पंपासाठी ०१ लाख ९० हजार रुपये, ०५ एचपीच्या पंपासाठी ०३ लाख ५० हजार रुपये तर ७.५ एचपीच्या पंपासाठी ०४ लाख ५० हजार रुपये अंदाजीत खर्च लागतो. यापैकी शेतकऱ्यांनी केवळ १० टक्के रक्कम भरून योजनेचा लाभ घेतल्यास ९० टक्के अनुदान शासनाकडून मिळते. सदरील शेतकरी हिताची योजना राबवत असताना, त्यांना अर्ज करण्यापासून ते लाभ मिळेपर्यंत मार्गदर्शन करणारे, साईड इंजिनियर म्हणून यांची भूमिका महत्त्वाची असते.

त्यामुळे जीके एनर्जी आणि शेतकरी यांच्यामधील दुवा असणारे साईड इंजिनियर यांनी उद्दिष्टेपूर्ती केल्यास त्यांचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मान करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातील एकूण १९ जणांचा यात समावेश असून, परभणी जिल्ह्यात शिंदे बंधूंना म्हणजेच दोघांना हा सन्मान मिळाला आहे. शाल स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Back to top button