मुंब्य्राच्या शाहनवाज ‘बद्दो’ ने ऑनलाईन गेमिंग अॅपच्या आधारे घडवले ४०० मुलांचे धर्मांतर | पुढारी

मुंब्य्राच्या शाहनवाज 'बद्दो' ने ऑनलाईन गेमिंग अॅपच्या आधारे घडवले ४०० मुलांचे धर्मांतर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मांतर घडवणाऱ्या धक्कादायक प्रकाराचे धागेदोरे ठाण्याच्या मुंब्र्यापर्यंत पोहोचले असून, या ऑनलाईन धर्मांतराचा सूत्रधार मुंब्य्रात राहणारा शाहनवाज उर्फ बद्दो निघाला. त्याच्या शोधात गाझियाबाद पोलिसांची दोन पथके दोन दिवसांपासून मुंब्रा व मुंबईत तळ ठोकून आहेत.

गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या साऱ्या घटनेची चौकशी एनआयए, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र पोलीस करू लागले आहेत. ठाणे व मुंबई पोलिसांच्या मदतीने गाझियाबाद पोलीस पथकांनी मुंब्रा, नवी मुंबई, मुंबई परिसरात दहा ठिकाणी छापे टाकले. मात्र, शाहनवाज उर्फ बद्दो हाती लागला नाही. त्याच्या मुंब्रा येथील घरी कुलूप लावलेले असून त्याचे नातेवाईक देखील घर बंद करून निघून गेले आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या कवीनगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाच्या पालकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा सारा प्रकार उघडकीस आला. गेम खेळणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले असून गाझियाबाद पोलिसांनी एका मौलवीस अटक केली आहे.

या मौलवीने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून धर्मांतर घडवण्याच्या कटाचा मास्टर माईंड शाहनवाज उर्फ बद्दो असल्याचे स्पष्ट झाले. शाहनवाज उर्फ बद्दो हा फोर्ट नाइट गेम आणि डिस्कॉर्ड या दोन अॅपवर हिंदू नावाने फेक आयडी बनवून अल्पवयीन तरुणांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा. तो गेम खेळण्यासाठी अल्पवयीन मुलांना विविध ट्रिक शिकवायचा. त्यात तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्हणायला लावायचा आणि जिंकून द्यायचा.

तुम्ही प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकता, असे तो मुलांना सांगायचा. त्यातून मुलांना पैसे मिळू लागल्याने त्यांचे हे आकर्षण वाढत गेले आणि हळूहळू ही मुले सहज इस्लाम पत्करू लागली. अशाच प्रकारे मुंब्रा शहर व अनेक ठिकाणच्या चारशेहून अधिक मुलांचे त्याने धर्मांतर घडवल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. दोन मुले मुंब्रा परिसरातील तर एक जण मुंबईतील राहणारा असल्याचे समजते.

पाक कनेक्शन

ऑनलाईन गेमिंग अॅपवरून जाळ्यात अडकलेल्या मुलांना शाहनवाज ऊर्फ बद्दो व त्याचे सहकारी काही व्हिडीओ व लिंक शेअर करून ते पाहण्यास भाग पाडत. त्यात झाकीर नाईक याच्यासह एका यूट्यूब चॅनेलची लिंक पाठवली जाई. गाझियाबाद पोलिसांनी या चॅनेलची पडताळणी केली असता ते पाकिस्तानमधून हाताळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रधार शाहनवाजचे कारनामे

  • फोर्ट नाईट गेम आणि डिस्कॉर्ड या दोन अॅपवर हिंदू नावाने शाहनवाज ऊर्फ बद्दोचे फेक आयडी
  • अल्पवयीन मुलांच्या गेमिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचा
  • गेम खेळण्यासाठी अल्पवयीनांना विविध ट्रिक शिकवत असे
  • तो मुलांना धार्मिक प्रार्थना म्हणायला लावे आणि झाकीर नाईकचे व्हिडीओही दाखवे
  • ‘तुम्ही प्रार्थना म्हटली तर गेम सहज जिंकू शकता,’ असे तो मुलांना सांगे
  • मुलांनी ही प्रार्थना म्हटली की, नंतर तो स्वतःच गेम हरायचा
  • अशाच प्रकारे त्याने मुंब्रा शहर व इतर ठिकाणच्या चारशेहून अधिक जणांचे धर्मांतर केल्याची माहिती
  • मुंबईसह देशभरात शाहनवाजच्या टोळीने चारशे मुलांचे धर्मांतर केले असून, त्यात मुंब्य्रातील दोन, तर मुंबईच्या एका मुलाचा समावेश आहे. यात आणखी काही मुले महाराष्ट्रात असू शकतात.
  • गाझियाबादच्या कवीनगरच्या तक्रारदाराचा मुलगा अचानक दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्यासाठी जाऊ लागला. कुठे जातोस, असे विचारले तर जीमला चाललो म्हणून सांगायचा. नंतर त्याचे नमाज पठण लक्षात येताच पालकांशी वाद घालत तो ठाम राहिला.

हेही वाचा : 

Back to top button