Kolhapur News | कोल्हापुरात दंगल! कुणी शहराबाहेरून आले होते का? तपास होणार | पुढारी

Kolhapur News | कोल्हापुरात दंगल! कुणी शहराबाहेरून आले होते का? तपास होणार

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन, कोल्हापुरात औरंगजेबाचा स्टेटस कुणी क्रिएट केला, याचा तपास सायबर पोलिसांकडून होणार आहे. कोल्हापुरात झालेल्या दंगलप्रकरणी ३६ जणांना अटक केलीय. जे पाच तरुण आहेत, ते महाविद्यालयीन तरुण आहेत. (Kolhapur News) तसेच या दंगलीत अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, ही दंगल घडवण्यामागे शहराबाहेरील कुणाचा हात आहे का, याचा देखील तपास होणार असल्याचे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. (Kolhapur News)

ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कुणी शहराबाहेरून आले होते का, याचा तपास केला जाईल. बंद दुकानाबाहेर जे सीसीटीव्ही होते, त्यातून फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी बंद पुकारण्याचे आवाहन केलं होतं, त्यांनी प्रक्षोभ वक्तव्य तर केलं आहे का, हेदेखील तपासले जाईल. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत.

औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. बुधवारी दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. गुरुवारी सकाळी शहरात सगळीकडे शांतता होती. शहरातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त असून शहरात गस्त सुरु आहे.

बुधवारी शहराच्या अनेक भागांत दगडफेक, तोडफोडीने दंगल उसळली होती. त्यात दोनशेवर वाहने, दुकाने, टपर्‍या, घरांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी वारंवार लाठीमार केला. जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या ३० पेक्षा अधिक नळकांड्या फोडाव्या लागल्या. सुमारे तीन तासांनी दंगल नियंत्रणात आली. दगडफेक, तोडफोडप्रकरणी अनेकजणांना ताब्यात घेण्यात आले आहे; तर दगडफेक, तोडफोडीत पोलिसांसह ६० जण जखमी झाले. दंगल लक्षात घेऊन प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा खंडित केली. दरम्यान, दंगलीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

इंटरनेट सेवा रात्री १२ पर्यंत बंद राहणार

कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून कोल्हापुरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.

Back to top button