Ulhasnagar Crime : पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर चारित्र्यावर घेतला संशय, लहान बहिणीचा भावाने केला खून | पुढारी

Ulhasnagar Crime : पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर चारित्र्यावर घेतला संशय, लहान बहिणीचा भावाने केला खून

उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या १२ वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत भावाने केलेल्या बेदम मारहाणीत (Ulhasnagar Crime)  बहिणीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. रुग्णालयात दुपारी २ च्या सुमारास एका १२ वर्षीय मुलीला उपचारासाठी तिचे कुटुंबीय घेऊन आले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैदयकीय अधिकारी डॉ. प्रतिक यांनी तिला तपासून मृत घोषित केले. तसेच तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने तत्काळ या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना कळवली.

पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत या प्रकाराबाबत विचारणा केली. यावेळी भावाने मृत मुलगी आपली सख्खी बहिण असल्याची माहिती दिली. तसेच तिला मीच मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची कबुली (Ulhasnagar Crime)  दिली.

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड याच्या आदेशाने पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश रालेभात यांच्या पथकाने भावाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा त्याने खळबळजनक माहिती दिली.
मृत मुलीला तीन दिवसांपूर्वी पहिल्यांदा मासिक पाळी आल्याने रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर भावाने वारंवार तिला कोणाशी तुझे शारीरिक संबंध झाले आहेत का? अशी विचारणा केली. मात्र, तिने काहीही सांगितले नाही. त्यामुळे तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पक्कडने मारहाण केल्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तर पोलिसांनी संशयित भावावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

हेही वाचा 

Back to top button