ठाणे जिल्हा हादरला! अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, ४ जणांना अटक | पुढारी

ठाणे जिल्हा हादरला! अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, ४ जणांना अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याणमध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केल्यानंतर चार जणांनी या अल्पवयीन मुलीला जाळ्यात अडकवले आणि चौघांनी अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. साहिल राजभर सुजल गवळी आणि विजय बेरा अशी आरोपींची नावे असल्याचे कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एका अल्पवयीन आरोपीची भिवंडीतील बालगृहात रवानगी करण्यात आली आहे.

कल्याण परिसरात राहणारी अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरूणाने माझे प्रेयसी सोबत भांडण झाल्याचे सांगून तिला भेटण्यास बोलावले. इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. एका रूमवर घेऊन गेलेल्या या बदमाशाने असह्यतेचा फायदा उचलून तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही बोलवून तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र यावेळी सदर रूममध्ये आणखी तीन जण हजर होते. या तिघांनीही तिच्यावर अतिप्रसंग केला. याच दरम्यान तरूणीच्या घरच्यांनी ती हरवली असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी माग काढत पीडित मुलीची तिला ठेवलेल्या रूममधून सुटका केली. पोलिसांनी अधिक तपास केला असता तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे समोर आले.

या मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली. पोलिसांनी शोध घेऊन चार तरूणांना ताब्यात घेतले. यात एक जण अल्पवयीन असल्याचे समोर आले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दत्तात्रय घोडे अधिक तपास करत आहेत.

Back to top button