महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही हे लवकरच कळेल : खासदार श्रीकांत शिंदे | पुढारी

महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही हे लवकरच कळेल : खासदार श्रीकांत शिंदे

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल, असं म्हणत महाविकास आघाडीचे नेते आधी आमच्यावर टीका टिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करत आहेत, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीत जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शिंदे यांनी टीका केली.

महाविकास आघाडीचे नेते दररोज जी वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न करतायत, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आतमध्ये महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करतात. आधी आमच्यावर करत होते, आता एकमेकांवर टीका करायला लागले आहेत. मात्र दुसरीकडे लोकांच्या मनातलं सरकार सध्या आलं असून गेल्या दहा महिन्यात वेगवान निर्णय आणि वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचं काम या सरकारने केल आहे. गेल्या अडीच वर्षातलं सरकार मात्र सुस्त होतं आणि गेल्या अडीच वर्षात काहीच काम झालं नव्हतं. तेच काम आम्ही गेल्या दहा महिन्यात करून दाखवलं आहे. म्हणूनच लोकांसमोर जाताना महाविकास आघाडीची एकी कशी दाखवता येईल? हे शोकेस केलं जातं. मात्र आता येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभा रद्द केल्या असून त्यामुळे ही वज्रमूठ राहते की नाही? हे आपणही पाहा, लोकही पाहत आहेत, असं खासदार शिंदे म्हणाले.

अजित दादांनाच सांगू द्या ते कुठे जातात?

अजित दादा तुमच्याकडे येणार आहेत का? असं पत्रकारांनी त्यांना विचारले असता, मी एक छोटा कार्यकर्ता असून तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही. अजितदादा इकडे जातात, तिकडे जातात, अशा बातम्या मीडियावर दाखवत असून अजित दादांना तरी सांगू द्या ते कुठे जातात, असं म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणं टाळले. त्याचवेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे म्हणाले की, आमच्याकडे कोणीही आलं तरी स्वागतच आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत संजय राऊत हे खरोखरच भांडणं लावतात का? असं खासदार शिंदे यांना विचारले यावर मला अशा माणसाबद्दलचे प्रश्न आपण विचारू नयेत, हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, असं म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर याबाबत बोलणे टाळले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही देशातल्या ज्या गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नव्हते. अशा गावांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मात्र कल्याण लोकसभा क्षेत्रातील मलंगगड भागाला अजुनही पाणी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेचा शुभारंभ त्यांनी केला होता. या योजनेच्या माध्यमातून शनिवार हा मलंगगड भागासाठी सुवर्णक्षण ठरला आहे. या एकाच वेळी ५६ गावांच्या ६५ कोटी रुपयांच्या खर्चातून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून सुमारे ५१ हजार कुटुंबांना नळाद्वारे घरोघरी पाणी दिले जाणार आहे. इतक्या वर्षात ज्या गावांमध्ये पाणी नव्हते, त्या गावांमध्ये थेट घरात नळाद्वारे पाणी दिले जाणार आहे. या कामांचे थेट कार्यादेश शनिवारी ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रशासक आणि उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

मंत्री गुलाबराव पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित

या शुभारंभ सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने या योजनेसाठी आवश्यक तितका निधी पुरवला आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच प्राथमिक सोयी सुविधांवर काम झाले आहे. त्यामुळे आजचा क्षण हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असल्याच्या भावना यावेळी मंत्री पाटील यांनी बोलताना व्यक्त केल्या. राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने गेल्या अडीच वर्षात न झालेली कामे अवघ्या दहा महिन्यात झाली आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्री मलंगगड येथे गेल्या काही वर्षात विविध सुविधा पुरवल्या आहेत. श्री मलंगगडावर जाणाऱ्या पायऱ्या, फ्यूनीकुलर रेल्वे, रस्ते, साकव, जनसुविधा यांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला आहे. तर संपूर्ण मतदारसंघात आतापर्यंत हजारो कोटी मिळवण्यात यश आले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

श्री मलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण १२ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार असून याचाही भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडला आहे. या रस्ते कॉंक्रिटीकरणामुळे गडाकडे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. यावेळी भाजपा आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, जिल्हा संघटक महेश पाटील, चैनू जाधव, महेश पाटील, राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button