भ्रष्ट काँग्रेसला दूरच ठेवा : अमित शहा | पुढारी

भ्रष्ट काँग्रेसला दूरच ठेवा : अमित शहा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण कर्नाटकाच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. त्यामुळे भ्रष्ट काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवा. ही निवडणूक कोणत्याही पक्षाची नसून तुमच्या भविष्याची आहे. त्यामुळे डॉ. रवी पाटील यांना मतदान करून आपले भविष्य सुरक्षित करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

बेळगाव उत्तरमधील भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (दि. 6) रोड शो केला. धर्मवीर संभाजी महाराज चौक ते गणपत गल्ली कॉर्नरपर्यंत रोड शो निघाला. मतदारांना आवाहन करताना गृहमंत्री शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात विकास पर्व सुरू केले आहे. देशाचे नाव जगात आदराने घेतले जात आहे. त्यामुळे कर्नाटकाच्याही विकासासाठी भाजपचे सरकार असणे आवश्यक आहे. डॉ. रवी पाटील यांना मतदान म्हणजेच नरेंद्र मोदी यांना मतदान आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी आणि भ्रष्ट काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला मतदान करा. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा.

उमेदवार डॉ. रवी पाटील यांनीही भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. गृहमंत्री अमित शहा यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली कोपर्‍यापर्यंत रोड शो झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. खासदार मंगल अंगडी, महानगर भाजप अध्यक्ष आमदार अनिल बेनके, भाजप प्रभारी अरूण सिंह आदी उपस्थित होते.

Back to top button