ठाण्यात पंडित धायगुडेचा विश्वविक्रम; २७० किलो वजनाची बाईक १५० वेळा गेली पोटावरून

ठाण्यात पंडित धायगुडेचा विश्वविक्रम; २७० किलो वजनाची बाईक १५० वेळा गेली पोटावरून

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगावेगळे काहीतर करण्याचा ध्यास घेतलेले मूळचे सांगलीचे पण नोकरीनिमित्त मुंबईत आलेले पंडित तुकाराम धायगुडे यांनी आज इतिहास रचला आहे. त्यांनी तब्बल २७० किलो वजनाच्या सुपरबाईक सुमारे १५० वेळा आपल्या पोटावरून जाऊ देण्याचा विश्वविक्रम केला आहे. आज (दि.७) ठाण्याच्या धर्मवीर मैदानात त्यांनी हा विश्वविक्रम दुस-यांदा केला. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे.

देशाचं नाव गिनीज बुकमध्ये नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंडित धायगुडे यांनी २००९ पासून तयारी सुरू केली. अखेर आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. धायगुडे यांनी पोटावरून दुचाकी १२१ वेळा जाऊ देण्याचा विक्रम २०१६ मध्ये केला होता. त्यांचा हा विक्रम मोडत पुन्हा एकदा पोटावरून १५० वेळा गाडी जाऊ देण्याचा नवा विश्वविक्रम केला. याशिवाय एक मिनीटात १०५ साईड सिट अप्स मारत त्यांनी विश्वविक्रम केला आहे.

धायगुडे यांचा जन्म १ जून १९८० साली सांगली मधील जत तालुक्यातील धायगुडे येथे झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. जतमध्येच त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्याची घरची परिस्थिती नसल्याने बाहेरून पदवी घेतली. त्यांना लहानपणापासून खेळाची आवड होती. त्यांनी 'अ‍ॅथलिट' म्हणून सुरुवात केली. कामानिमित्त ते मुंबईत आले, बकरी मंडईमध्ये त्यांनी काम करत असतानाच सरावही केला. 2003 साली ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई म्हणून रूजू झाले. त्यानंतर बँकेकडून ते ५, १०, २१ किलोमीटरच्या विविध स्पर्धांमध्ये धावत होते. त्यांनी २०१६ मध्ये २५७ किलो वजनाच्या दुचाकी १२१ वेळा पोटावरून जाऊ देण्याचा विक्रम 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंदवला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news