’गो फर्स्ट’ प्रकरणी सरकारने लक्ष घालावे; टॅप ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेची मागणी | पुढारी

’गो फर्स्ट’ प्रकरणी सरकारने लक्ष घालावे; टॅप ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘उन्हाळी सुटीच्या हंगामात गो फर्स्ट एअरलाईनच्या अचानक ऐच्छिक दिवाळखोरी प्रकरणामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष घालून व्यावसायिकांना सहकार्य करावे, तसेच विमानभाड्यावर मर्यादा आणाव्यात,’ अशी मागणी टॅप ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष दीपक पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुजारी म्हणाले, ’गो फर्स्ट एअरलाईनच्या निर्णयामुळे सामान्य पर्यटक व यांना सेवा पुरवणार्‍या पर्यटन संस्था यांची प्रचंड गैरसोय होऊन सर्वजण अडचणीत आले आहेत. पर्यटन संस्थांकडून उन्हाळी पर्यटनाचे नियोजन हे सहा महिन्यांपूर्वी केले जाते. त्यासाठी विमान कंपन्यांना, हॉटेल्स, लोकल सेवा देणार्‍या, पर्यटकांची वाहतूक करणार्‍या, याप्रमाणे इतर बर्‍याच गोष्टींवर आगाऊ परत न मिळणायोग्य देयके अदा करावी लागतात.

अशा अचानक उद्भवलेल्या संकटामुळे चूक नसतानाही, पर्यटन संस्थांना पर्यटकांच्या रोषाला व कायदेशीर गोष्टींना सामोरे जावे लागते. सरकारने आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी गो फर्स्ट एआलाईनच्या या हंगामातील असलेल्या सर्व रूटवर सेवा देण्यास त्यांना आदेश द्यावेत, इतर विमान कंपन्यांना त्यांचे स्लॉट तात्पुरते द्यावेत, कोविडमध्ये ज्याप्रमाणे विमानभाड्यावर मर्यादा आणल्या होत्या, त्याचप्रमाणे पुढील दोन महिन्यांसाठी विमानभाड्यावर मर्यादा आणाव्यात, ग्राहकांच्या तिकिटाचा परतावा पर्यटन कंपन्यांच्या बँकेत द्यावा, हॉटेल्स व इतर सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांना ग्राहकांनी ट्रीप कॅन्सल करण्यासाठी विनंती केली तर काही चार्ज लावू नये आदी मागण्या सरकारने मान्य कराव्यात’, असेही पुजारींनी सांगितले.

उन्ह्याळ्यातील सुट्यांचे दिवस चालू असताना गो फर्स्टसारख्या विमान कंपनीने अनपेक्षितपणे दिवाळखोरी जाहीर केली आहे. पर्यटन व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून ’जेट एअरवेज’ तसेच ‘किंगफिशर’ प्रकरण आणि कोव्हिड यासारख्या अनेक आपत्तींमधून मार्ग काढत आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय ‘पुढे चांगले दिवस येतील’ असे धरून काम करत आहेत. मात्र, या कपंनीने दिवाळखोरी जाहीर करून पर्यटन कंपन्यांची फसवणूक केली आहे. सरकारने आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी या प्रकरणात लक्ष घालून पर्यटन कंपन्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत.

                                                  – कॅप्टन नीलेश गायकवाड
                                  संस्थापक, संचालक, कॅप्टन नीलेश हॉलिडेज

आम्ही ‘गो फर्स्ट’वर भारत आणि आशियातील विविध स्थळांसाठी तिकिटे बुक केली आहेत. ’पीक सीझन’मध्ये एअरलाइन्सने हा निर्णय घेतला आहे. सरकारने हस्तक्षेप करून ग्राहकांचा विचार करावा आणि एअरलाईन सुरू ठेवण्यास भाग पाडले पाहिजे.

                                 – अखिलेश जोशी, गिरीकंद हॉलिडेज

सहा महिने आधी पैसे भरून सीट राखीव ठेवाव्या लागतात आणि असं अचानक एअरलाईनचं बंद पडणं छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रास देऊन जातं. चांगले ग्राहक तुटतात. कारण नसताना नात्यांमध्ये वितुष्ट येते. हॉटेल्स, जेवण, स्थळदर्शन सगळ्यांचे आगाऊ भरलेले पैसे मोठी काळजी लावून जातात. सर्व नुकसान सरकारने एअरलाईनकडून वसुल करून, पर्यटन व्यावसायिकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. नाहीतर याचे गंभीर परिणाम पर्यटनावर झाल्याशिवाय राहाणार नाहीत.

                                     – मिलिंद बाबर, मँगो हॉलिडेज

Back to top button