ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) युती असली तरी ठाण्यात मात्र, दोन्ही पक्षात परिस्थिती फारशी आलबेल नसल्याने आता ठाण्यावरची पकड कायम ठेवण्यासाठी शहरात मुख्यमंत्री कार्यालय उभे राहणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यासंदर्भात एक निविदा प्रसिद्ध केली असून ही निविदा फर्निचरच्या कामांसाठी काढण्यात आली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या निविदेमध्ये मुख्यमंत्री कार्यालय असा उल्लेख असल्याने लवकरच ठाण्यात हे मुख्यमंत्री कार्यालय उभे राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात पालिका आयुक्तांच्या कार्यालयाचाही समावेश करण्यात आला असून ठाणे महापालिकेच्या कारभारावर तसेच ठाण्यात सुरु असलेल्या विकासकामांवर थेट मुख्यमंत्र्यांचा वॉच असणार आहे. याचा फायदा त्यांना महापालिकेच्या निवडणुकीतही होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे आता कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील कशिश पार्क भागात नवीन कार्यालय उभे राहणार आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ४ कोटी ६० लाखांचा खर्च केला जाणार आहे. या कार्यालयामुळे शिंदे यांची नजर थेट महापालिकेच्या कारभारावर आणि मतदारांवर देखील राहणार आहे. याच कार्यालयाच्या इमारतीत ठाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालयही बांधण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईतील वर्षा निवासस्थानी राहत नसून ठाण्यातही त्यांचे लुईसवाडी येथे शुभदिप बंगल्यात निवासस्थान आहे. त्यामुळे त्यांची सर्व कामे येथूनच होत आहेत. यामुळे त्यांच्या घराला देखील कार्यालयाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील कोपरी-पाचपाखाडी येथील कशिश पार्क येथील पालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच इमारतीत त्याच मजल्यावर पालिका आयुक्तांचे देखील कार्यालय असणार आहे.
वागळे इस्टेट येथे असलेल्या शासकीय कृषी विभागाच्या कार्यालयाची जागा क्लस्टर नियोजनासाठी वापरण्यात येणार असल्याने तात्पुरते कृषी विभागाचे कार्यालय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतच राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या नगर अभियंता यांच्या वतीने बांधकाम व फर्निचरची मुख्यमंत्र्यांसह कृषी विभागाचे कार्यालय आणि महापालिका आयुक्त कार्यालयाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ३ मेरोजी दुपारी ४ वाजेपर्यंत निविदा भरता येणार असून ते ८ मे रोजी ती उघडली जाणार आहे.
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात आणायचे आहेत. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांचे कार्यालय एकाच मजल्यावर असणार आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या कारभारावर शिंदे यांची पकड कायम राहणार आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत मिळू शकेल, अशी चर्चा आहे.
हेही वाचा