मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड येथील एका डॉक्टरचे अपहरण करून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या पाच जणांना पकडण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे. त्यांना २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मुरबाड येथील जितेंद्र बेंढारी हे २१ ऑक्टोबर २०२२ रोजी नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांना अज्ञात इसमाने हात करून काही अंतरावर सोडण्यास सांगितले. यात पुढे जाऊन त्यांचे अपहरण झाले. या अपहरणकर्त्यांना ३० लाख रुपये देऊन बेंढारी यांनी आपली सुटका केली. त्यानंतर बेंढारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास चक्रे फिरवीत पोलिसांनी गुरूवारी (दि. २०) रोजी ५ अपहरणकर्त्यांना जेरबंद केले. त्यांना शहापूर कोर्टात हजर केले असता २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
या गुन्ह्यात कोणताही पुरावा नव्हता, फिर्यादीकडूनदेखील कोणतेही धागे दोरे मिळाले नव्हते, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अतिशय बारकाईने तपास करून या अपहरणकर्त्यांना पकडण्यात आले आहे. तपासकार्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिस स्टेशनचे व. पो. नि. प्रसाद पांढरे, सपोनि अनिल सोनोने, पीएसआय अरुण सावंत, नरेश निंबाळकर, रामेश्वर तळेकर, सफौ. भगवान निचीते, पो. ना. अमोल माळी, सचिन उदमले, तांत्रिक अंमलदार दीपक गायकवाड, पो.शि. चालक शरद शिरसाट यांनी सहभाग घेतला.
हेही वाचलंत का ?