Nashik : ‘तो’ खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक | पुढारी

Nashik : 'तो' खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

पिंपळकोठे येथील तरुण प्रवीण सोनवणे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी भोंदूबाबा तुळशीराम सोनवणे (रा. अलियाबाद) याला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा खून हा अनैतिक संबंधाच्या रागातून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

आलियाबाद येथील भोंदूबाबा तुळशीराम सोनवणे याच्या घरात चार दिवसांपूर्वी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. या बाबाकडे उपचार घेण्यासाठी जातो, असे घरी सांगून प्रवीण गेला. मात्र आठ दिवस उलटूनही तो घरी परतला नव्हता. दरम्यान बाबाच्या घरात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून बाबा फरार असल्याने अनेक तर्क- वितर्क लावले जात होते.

पोलिसांनी माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दात कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान पोलिस निरीक्षक संदीप पाटील तसेच गुन्हा शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आपल्या सहकाऱ्यांसह गस्त करीत असताना चाळीसगाव शहरातील दत्तवाडी परिसरात वनविभागाच्या भिंतीलगत तुळशीराम बुधा सोनवणे (३२, रा. अलियाबाद) मिळून आला. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन फूट लांबीची एक लोखंडी सळई मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याची अधिक चौकशी करण्यात आली. त्याने माहिती दिली की, त्याचा दूरचा नातेवाईक प्रवीण सोनवणे (रा. पिंपळकोठे) याचे त्याच्या बायकोशी अनैतिक संबंध होते. प्रवीण हा नेहमी अघोरी विद्या शिकण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे येत जात होता. तसेच आरोपी तुळशीराम यास प्रवीण सोनवणे गुरुसुद्धा मानत होता. प्रवीण सोनवणे याने तुळशीराम याच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवल्याने त्याचा राग मनात धरून प्रवीण सोनवणे यास राहते घरी बोलावून गळफास देऊन प्रवीण सोनवणे यास जिवे ठार मारले.

तो मेल्याची खात्री झाल्यावर प्रवीणचा मृतदेह घरीच सोडून पळ काढला. प्रवीण सोनवणे हा घरी न आल्याने त्याच्या नातेवाइकांनी जायखेडा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. शोध तपासात त्याचा मृतदेह तुळशीराम सोनवणे याच्या राहत्या घरात मिळून आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिस आरोपी तुळशीरामचा शोध घेत होते. तो अलियाबाद गावात मांत्रिक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यास अटक करून जायखेडा पोलिस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले. शुक्रवारी (दि. २१) त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Asia Cup 2023 | पाकची भारतापुढे शरणागती! आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात; पण भारताचे सामने तटस्थ देशात

Back to top button