ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी

ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना ९ एप्रिल पर्यंत मुंब्रामध्ये प्रवेशबंदी केली आहे. मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मजार, मशीद, दर्गे हे पंधरा दिवसात हटवा, अन्यथा तेथे हनुमान मंदिर उभारू, असा इशारा त्यांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदीची नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. जाधव यांच्यावर याआधी राजकीय गुन्हे असल्याने त्यांच्याकडून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

२३ मार्च पासून पवित्र रमजान महिना सुरू असून २२ एप्रिलला रमजान ईद साजरी होणार आहे. मुंब्रा हा अतिसंवेदनशील भाग असून तुमच्या वक्तव्यामुळे गंभीर गुन्हे घडून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९ एप्रिल पर्यंत मुंब्र्यात प्रवेश करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त शिंदे यांनी म्हटले आहे. मुंब्र्यातील अनधिकृत मजार, दर्गा तोडावे, अशी मागणी केल्यानंतर सोशल मीडियावर अविनाश जाधव यांना मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून अनधिकृत मजार, दर्गा तोडण्याची विनंती केली. त्यानंतर अविनाश जाधव यांना मुंब्रा पोलिस हद्दीत प्रवेश बंदीची नोटीस काढण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news