परभणी : ४ हजारांची लाच घेतांना पंचायत समितीचा बीडीओ व विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात | पुढारी

परभणी : ४ हजारांची लाच घेतांना पंचायत समितीचा बीडीओ व विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात

मानवत; पुढारी वृत्तसेवा प्रशिक्षण कामाचे आलेले १४ हजार रुपये मानधनासाठी ४ हजार रुपयांची कमिशन स्वरूपी लाच घेतल्याप्रकरणी मानवत पंचायत समितीचा गटविकास अधिकारी स्वप्नील पवार व विस्तार अधिकारी संदीप पवार या दोघांना सोमवारी (ता २७) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली कारवाई रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, एका (३३ वर्षीय) व्यक्तीने १७ ऑक्टोबर २०२२ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचा गाव आमचा विकास या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दिले होते. या कामाचे तक्रारदार यांचे १४ हजार रुपये मानधन विस्तार अधिकारी संदीप पवार यांच्या खाजगी बँक खात्यावर जमा झाले होते. सदर मानधन घेण्यासाठी तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना वारंवार भेटून मानधन देण्याची मागणी केली. तसेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही फायदा न झाल्याने २२ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. विस्तार अधिकारी संदीप पवार याने १४ हजार रुपये रकमेचा देय चेक न देता १० हजार रकमेचा स्वतःच्या बँक खात्याचा चेक देऊन ४ हजार रुपये कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्वीकारली. तसेच सदर मागणी केलेल्या व स्वीकारलेल्या लाचेच्या रकमेस गटविकास अधिकारी स्वप्नील पवार याने पंचासमक्ष प्रोत्साहन देऊन समंती दिल्याचे सिद्ध झाले.

सोमवारी लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, बसवेश्वर जकीकोरे, चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलिंद हनुमंते, अतुल कदम, शेख मुख्तार, शेख झिब्राईल, जनार्धन कदम यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास येथील पंचायत समितीच्या कार्यालयातच सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. बँक खात्याची संपूर्ण चौकशी करून त्‍याला पोलिसांच्या ताब्‍यात देण्यात आले. या विषयी त्‍याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button