ठाणे : शिळफाटा चौकात अग्नितांडव; एकाचा जागीच मृत्यू, अद्यापही आगीवर नियंत्रण नाही | पुढारी

ठाणे : शिळफाटा चौकात अग्नितांडव; एकाचा जागीच मृत्यू, अद्यापही आगीवर नियंत्रण नाही

नेवाळी; (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा कल्याण ग्रामीण भागातील शिळफाटा चौकात आज (शुक्रवार) अगीतांड्व पाहावयास मिळाले. हॉटेल मधील कचरा नाल्यात टाकल्याने त्याची गॅस तयार होऊन आग लागल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या आगीची तीव्रता एवढी भीषण होती कि नाल्यांवरील चेंबर्सना तडे गेले आहेत. सध्या पहाटेपासून अग्निशमदलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना अवघड झाले आहे.

कल्याण ग्रामीण भागातील शिळफाटा चौकात मोठे हॉटेल्स आहेत. या हॉटेल्स मधील कचरा हा थेट नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने ते सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू लागलं आहे. आज पहाटे लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. गटारात निर्माण झालेल्या गॅसला लागलेली आग थेट टोरंट कंपनीच्या केबलला लागली. मात्र सुदैवाने या परिसरातून जाणाऱ्या बीपीसीएलच्या गॅस लाईनला हि आग लागली नाही. त्यामुळे पहाटे लागलेली आग सकाळचे नऊ वाजले तरी नियंत्रणात आली नव्हती.

पोलिसांकडून सध्या सतर्कता बाळगण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दररोजचा हॉटेल मधील वेस्टेज हा गटारात नाल्यात सोडणाऱ्या या हॉटेल्स चालकांवर ठाणे मनपाने कारवाई का केली नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. मात्र मनसेचे स्थानिक पदाधिकारी शरद पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार, एका पानटपरी चालकाचा यामध्ये मृत्यू झाला असून, जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरात सध्या आगीचे लोळ पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रत्यत्न सुरू आहेत. या दुर्घटणेत विशाल सिंग या पानटपरी चालकाचा मृत्‍यू झाला आहे. तर जयेंद्र गोटीराम पाटील हा रिक्षा चालक जखमी झाला आहे.

अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. टीडीआरएफची पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. टीएमसीचे अधिकारी आणि बीपीसीएलच्या टीम देखील घटनास्थळी दाखल झाल्‍या आहेत. यामध्ये ठाणे मनपाची जलवाहिनी देखील फुटली आहे.
परिसरातील इंटरनेट सेवेवर देखील याचा परिणाम झालेला आहे. त्‍यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप अग्निशमन दलाला यश मिळालेले नाही. बीपीसीएलची गॅस लाईनला लिकेज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीमुळे शिळफाटा चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील १० ते १२ चेंबर्स मधून धूर बाहेर पडत आहे.
परिसरात आगीची तीव्रता वाढली

सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून कल्याण फाटा येथून शिळफाटाकडे जाणारी एक लेन बंद करण्यात आली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा : 

Back to top button