बिजिंग : शी जिनपिंग (Xi Jinping) यांची शुक्रवारी चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसर्यांदा निवड झाली. शी जिनपिंग यांचे चीनच्या राजकीय क्षेत्रात वर्चस्व कायम आहे. ते २०१३ मध्ये राष्ट्राध्यक्ष बनले होते. आता त्यांची एकमताने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. १४ व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या चालू अधिवेशनात शी जिनपिंग यांची पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (PRC) चे अध्यक्ष आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे (Central Military Commission) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, असे वृत्त शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
शुक्रवारी वार्षिक नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या प्रतिनिधींनीही औपचारिकपणे शी यांची केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड केली. ऑक्टोबरमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या नॅशनल काँग्रेसमध्ये शी यांनी सत्ताधारी पक्षावरील त्यांच्या नेतृत्त्वाची पकड मजबूत केली.
शी जिनपिंग सोमवारी होणाऱ्या संसदीय बैठकीच्या समारोप समारंभात संबोधित करणार आहेत. त्या दिवशी नंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील, असे सांगण्यात आले आहे.
चिनी संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन गेल्या रविवारी सुरू झाले होते. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्याला हजेरी लावली. चीनने आपल्या संरक्षण खर्चात यंदा ७.२ टक्के वाढ करण्याचे ठरविले आहे. २०२३ मध्ये चीन संरक्षणावर १८ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा ही रक्कम ३ पटीने जास्त आहे. आठवडाभर हे अधिवेशन सुरू राहिले असून त्यात शी जिनपिंग यांचा कार्यकाळ तिसर्यांदा वाढवण्यात आला आहे. (Xi Jinping)
जिनपिंग २०१२ मध्ये सत्तेत आले. तत्पूर्वीच्या सर्व नेत्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर वा वयाची ६८ वर्षे पूर्ण केल्यानंतर नियमाबरहुकूम निवृत्ती पत्करली होती. पण जिनपिंग यांनी २०१८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची मर्यादा संपुष्टात आणली. तहहयात राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा करून घेतला होता.
हे ही वाचा :