ठाणे : दैव बलवत्तर म्हणून रेल्वे अपघात टळला, कसारा रेल्वे रुळाखाली खड्डा पडल्याने एक लोकल रद्द | पुढारी

ठाणे : दैव बलवत्तर म्हणून रेल्वे अपघात टळला, कसारा रेल्वे रुळाखाली खड्डा पडल्याने एक लोकल रद्द

कसारा (ठाणे) : कसारा कल्याण रेल्वे मार्गावरील कसारा उबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील खडीचा भराव खचून खड्डा पडल्याने आज सकाळी ६:२० वाजल्यापासून कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून रेल्वेचा मोठा अनर्थ टळला. आज सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कसारा उबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनीवरील रेल्वे रुळाखालील खडी अचानक दबली गेली आणि अचानक मोठा खड्डा तयार झाला होता.

दरम्यान एक मेल एक्सप्रेस भरधव वेगात कल्याण दिशे कडे रवाना झाली. त्यामुळे रेल्वे रुळाखालील खडी जास्त प्रमाणात खचून त्याठिकाणी मोठा खड्डा तयार झाला ही बाब मेल एक्सप्रेसच्या मागून येणाऱ्या कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल च्या मोटरमन व काही प्रवाशाच्या लक्षात आली. लोकलच्या मोटरमनने लोकल हळूहळू उबरमाळीच्या दिशेने नेली. रेल्वे रुळ घटनेबाबतची माहिती उबरमाळी, कसारा, रेल्वे स्टेशन मास्तर आणि रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ दखल घेत कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील वाहतूक काही काळ रोखून धरली. घटनेची माहिती उपलब्ध होताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी २ किलोमीटरची पायपीट करीत घटनास्थळ दाखल झाले. तत्काळ दुरुस्तीचे काम सुरु करून खड्ड्याच्या ठिकाणी तत्काळ दगडी टाकून, त्यावर खडी भरलेल्या गोण्या टाकून भराव तयार केला. दरम्यान यामुळे आज सकाळी एक कसारा मुंबई सीएसटी लोकल रद्द करण्यात आली. परिणामी, चाकरमानी प्रवाशांसह शालेय विद्यार्थी, परीक्षार्थींचे हाल झाले.

कायमस्वरूपी उपाययोजना नाही…

दरम्यान आज ज्या ठिकाणी खडी दबल्याने खड्डा पडला, त्या ठिकाणी या अगोदर दोन वेळा पावसाळ्यात असा प्रकार घडला होता. परंतु त्यावेळी सुद्धा तात्पुरता काम केले होते. दरम्यान तात्पुरता मलमपट्टी करून वेळ मारून न्यायचे काम करणाऱ्या रेल्वे प्रशासनामुळे एक दिवस मोठा अनर्थ होऊ शकतो.

दैव बलवत्तर म्हणून…

दरम्यान, या कमकुवत रेल्वे ट्रॅकवरून भरधाव गेलेली मेल एक्सप्रेसच्या वजनाने भराव खचलेल्या ठिकाणचे रेल्वे ट्रॅक तुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता.

कल्याण कसारा रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

दरम्यान कल्याण कसारा रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक कायम या ना त्या कारणाने विस्कळीत असते. त्यामुळे या मार्गावर रोज प्रवास करणारे चाकरमानी प्रवासी पुरते वैतागले असून प्रवशांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रवासी संघटना या कुचकामी ठरत आहेत.

Back to top button