86 वर्षीय आजीचे उपोषण मागे; शेतातील घरी जाण्यासाठी केली होती रस्त्याची मागणी | पुढारी

86 वर्षीय आजीचे उपोषण मागे; शेतातील घरी जाण्यासाठी केली होती रस्त्याची मागणी

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या शेतातील घरी जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी सपकाळवाडी (ता. इंदापूर) येथील प्रकाश साहेबराव पवार यांनी 2018 मध्ये इंदापूर तहसील कार्यालयाकडे अर्ज दाखल केला. सदर प्रकरण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, इंदापूर यांच्याकडे न्यायप्रविष्ठ आहे. हा दावा निकाली निघत नसल्याने बुधवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी साहेबराव पवार यांनी त्यांच्या 86 वर्षीय आईसह 12 वर्षांच्या नातवंडांना घेऊन इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. ते रात्री तहसीलदारांच्या आश्वासनांतर मागे घेण्यात आले.

आपल्या शेतीतील पिकणारा शेतमाल बाहेर काढण्यासाठी रस्त्याची सोय नसल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. जोपर्यंत दावा निकाली निघत नाही; तोपर्यंत आपण आमरण उपोषण करणार असल्याची भूमिका प्रकाश पवार यांसह कुटुंबाने घेतली होती. दरम्यान नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन 9 मार्च रोजी सुनावणी ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले.

मात्र, तरीही पवार कुटुंबीय निकाल होईपर्यंत जागेवरून न हलण्याची भूमिकेवर ठाम होते. दरम्यान रात्री उशिरा तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यावर हे उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख महारुद्र पाटील, देविदास भोंग, शेतकरी संघटनेचे किरण मदने उपस्थित होते.

Back to top button