महाराष्ट्रात वाचन संस्कृतीची लाट येणार : अच्युत गोडबोले | पुढारी

महाराष्ट्रात वाचन संस्कृतीची लाट येणार : अच्युत गोडबोले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली शहरात पुस्तकांचे आदान – प्रदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अशी ओरड होत असते. मात्र या कार्यक्रमामुळे या वाक्याला छेद मिळाला असून या कार्यक्रमामुळे वाचन संस्कृतीला चांगलाच वाव मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे पूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीची एक लाट येईल, असे प्रतिपादन अच्युत गोडबोले यांनी शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली येथे केले.

सांस्कृतिक डोंबिवली एक परिवार, आमदार मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे आदान – प्रदान सोहळ्याचे डोंबिवली येथील बंदिस्त क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते.

यावेळी त्यांनी मला या कार्यक्रमामुळे अतिशय आनंद होत आहे. वाचन संस्कृतीचा लोप होत चालला आहे. पुस्तक वाचली जात नाहीत अशी ओरड कायमच सुरू असते. मात्र या वाक्याना पै फ्रेंड्स लायब्ररीने पूर्ण छेद दिला आहे. इतका भव्य कार्यक्रम अनेक वर्षात मी बघितला नव्हता असे सांगताना फ्रँकफर्ट बुक सेलची आठवण झाल्याचे नमूद केले.

मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा आज मी पाहिला असे सांगत पुस्तक लायब्ररी ऑनलाईन सुरू करणे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवणे हे कठीण काम आहे. त्याहून कठीण आदान – प्रदान सारखे कार्यक्रम घेणे हे आहे असे ते म्हणाले. मात्र, पै हे खूप मोठे कार्य करत आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मला या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय उत्साह वाटला. अशा कार्यक्रमांमुळे सगळीकडे पुस्तक वाचनाची एक लाट येईल असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी यावेळी केले.

पुस्तक आदान प्रदान हा कार्यक्रम दहा दिवस चालणार असून यामध्ये जवळपास 2 लाख पुस्तकांची आदान प्रदान होणार असल्याची माहिती पुंडलिक पै यांनी दिली. विशेष म्हणजे यात विविध भाषेतील पुस्तकांचे आदान प्रदान होणार आहे. आज शुक्रवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अच्युत गोडबोलेसह सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित होते. अच्युत गोडबोले यांनी पुस्तकांची पाहणी केली. पुढील दहा दिवसात या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार असल्याचे माहिती पुंडलिकपे यांनी दिली.

हेही वाचा;

Back to top button