ठाणे : मेट्रोचे बांधकाम सुरू असलेली लोखंडी प्लेट कोसळल्‍याने महिलेचा मृत्‍यू | पुढारी

ठाणे : मेट्रोचे बांधकाम सुरू असलेली लोखंडी प्लेट कोसळल्‍याने महिलेचा मृत्‍यू

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे येथील मुंबई नाशिक रोड जवळ, उत्सव हॉटेल समोरच्या बाजूला, विवियाना मॉल जवळ मेट्रोचे काम सुरू आहे. आज गुरुवारी सकाळी 9.50 वाजताच्या सुमारास या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, सुनिता बाबासाहेब कांबळे (वय ३७ वर्षे, राहणार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाळ, लोकमान्य नगर पाडा क्रमांक:-३, परेरा नगर, लोकमान्य नगर), असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला भंगार गोळा करण्याचे काम करते. ती सकाळी भंगार गोळा करण्यासाठी या ठिकाणी गेली होती. अचानक तिच्या अंगावर लोखंडी प्लेट पडली. यावेळी तीचा जागीच मृत्‍यू झाला. घटनास्थळी तात्‍काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, राबोडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वर्तक नगर पोलीस कर्मचा-यांनी धाव घेतली.

मेट्रोच्या कर्मचा-यांनी खड्ड्यातून महिलेचा शव बाहेर काढला. या प्रकरणी राबोडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-हेही वाचा 

Back to top button