पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरणे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे, अटक कराच, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्दाचा वापर करत ट्वीट केले होते. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे. ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत, तेच खरे गुन्हेगार आहेत." असे परांजपे यांनी म्हटले होते. या ट्वीटनंतर बाळासाहेबांची शिवसेनेने परांजपे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांच्या विरोधात कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा या चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. व त्या Cognisable Offence मध्ये घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार, अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे. आपल्या राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे होऊ लागली की काय? अटक कराच…" असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :