पुढारी ऑनलाईन: मनोरंजन क्षेत्रातून दिवसेंदिवस धक्कादायक घटना, गोष्टी समोर येत आहेत. मनोरंजन क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेमध्ये काम करणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवरच आपली जीवन यात्रा संपवली. यावेळी तिचे वय अवघे २० वर्ष होते. या धक्कादायक घटनेमुळे तिचे सहकारी आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर ( Vaishali Takkar ) हिने इंदौर येथे गळफास घेऊन जीवन संपवले. प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्रींनी आपली जीवनयात्रा संपवणे हे मनोरंजन क्षेत्राला काही नवीन नाही. २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूने या क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.
गेल्या काही वर्षांत भारतातील मनोरंजन क्षेत्रातील कहानी घर घर की फेम समीर शर्मा, कॉमिक ते खलनायकापर्यंत पोहचलेला आसिफ बसरा, बालिका वधू मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी, अनेक हिट चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून दिसलेला कुशल पंजाबी, बॉलिवूड अभिनेत्री जिया खान, 'दिल तो हैप्पी है' या टीव्ही शोमधील सेजल शर्मा यांनी देखील जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. परवीन बाबी, जिया खान, यांसारख्या अनेक जुन्या सेलिब्रेटींनी देखील काही कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली होती.
मानसशास्त्र अभ्यासकांच्या मतानुसार, सेलिब्रेटींना वैयक्तिक जीवनातून सामाजिक जीवनात प्रवेश करताना परिस्थितीशी जुळवून घेता न येणे, यश-अपयशाचा समतोल साधता न आल्याने आपल्या जीवनाचा शेवट करतात. बहुतेक वेळा नातेसंबंधांमुळे आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर मानसिक स्थिती, आयुष्यातील ताणतणाव, अपयश आणि एकाकीपणा या कारणाने देखील मनोरंजन क्षेत्रातील काहींनी आपल्या जीवनाचा शेवट केल्याचेही अनेक घटनांमधून समोर आले आहे.
'नॅशनल क्राईम रेकॉर्ड'नुसार, वेगवेगळ्या स्तरातील लोकांची जीवन संपवण्याची कारणे ही वेगवेगळी असतात. यामध्ये सामान्यत: व्यावसायिक किंवा करिअरमधील समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, व्यसन, दारू, आर्थिक नुकसान, तीव्र वेदना यांसारख्या कारणाने व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवू शकते, असे यामध्ये म्हटले आहे.