ठाणे : इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात; रपेट मारायला गाडी घेऊन गेलेला परत आलाच नाही | पुढारी

ठाणे : इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात; रपेट मारायला गाडी घेऊन गेलेला परत आलाच नाही

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सध्या सोशल मीडियाद्वारे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. डोंबिवलीत पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवरील ओळखीचा फायदा घेत नवी कोरी दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून त्याने आणखी चार ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर आपण भेटूया, असे अनिकेतने डोंबिवलीत राहणारे फिर्यादी करण सागवेकर यांना सांगितले. त्यानुसार ठाकुर्ली  रेल्वेस्टेशनजवळ भेटायचे ठरले. करण दुचाकी घेऊन अनिकेतला भेटायला आला. यावेळी तुझी नवीन गाडी चालवून बघतो, असे सांगून अनिकेत दुचाकी घेऊन रपेट मारायला गेला, तो परत आलाच नाही. बराच वेळ अनिकेतची वाट बघून दुचाकी चोरीला गेल्याची निदर्शनास आल्याने त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली. दरम्यान सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी अनिकेतला कल्याण परिसरातून सापळा रचून अटक केली.

याआधी देखील अनिकेतने ठाणे शहरातील कोपरी आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले. त्यामुळे आरोपी अनिकेत वाडकर हा फिरस्ता आहे.

पुढील तपास पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक भराडे करत आहेत.

           हेही वाचलंत का ?

Back to top button