कोल्हापूर : वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाच्या ‘कॅमेरा ट्रॅप’ने उमटवली मोहोर : पाहा Exclusive Photo | पुढारी

कोल्हापूर : वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाच्या 'कॅमेरा ट्रॅप'ने उमटवली मोहोर : पाहा Exclusive Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकण आणि कोकणमार्गे कोल्हापूरात संचार करणा-या वाघांच्या अस्तित्वावर अखेर वनविभागाने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मोहोर उमटवली आहे. दक्षिण कोकण आणि कोल्हापूरात वनविभाग आणि संशोधकांना ८ वाघांचे दर्शन घडले आहे. त्यापैकी वाघाची एक जोडी आता दक्षिण कोकणातील मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जंगलात कायमस्वरुपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे .

कर्नाटक आणि गोवा राज्यांतून काही काळासाठी कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यात वाघ येतात. गुरांची शिकार होत असल्याने या भागांत वाघ दिसून येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली. दोनवर्षांपूर्वी कोकण आणि कोल्हापूरात जाहीर झालेल्या संरक्षित क्षेत्रात हे ८ वाघ वावरताना संशोधकांना दिसले.

२०१४ सालापासून वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट ही संस्था कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून कोकणातून येणार्‍या आणि जाणार्‍यावाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. आठवर्षांपासून वाघाची एक जोडी कोकणात कायमस्वरुपी राहत असल्याची खुशखबर वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी दिली. अन्‍य सहा वाघांचे दर्शन सतत दिसून येत असले तरीही त्यांना स्थानिक वाघ म्हणणे घाईचे ठरेल. दरवर्षाला कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यांत किती वाघ स्थायिक झालेत याबाबतची खात्रीलायक माहिती मिळेल, असेही ते म्हणाले.

वनविभाग वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जनावरांना तातडीने नुकसानभरपाई देत आहे ही बाब वाघांच्या संवर्धनाला हातभार लावण्यास मदत करत असल्याचे समाधानही पंजाबी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघ काही काळासाठी कोकण पट्ट्यांत येत आहेत. वाघीणींची संख्या कमी असल्याने वाघ या भागांत फार काळ थांबत नसल्याचेही पंजाबी म यांनी सांगितले.

 २२ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप

नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत दक्षिण कोकण आणि कोल्हापूरातील २२ ठिकाणी प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवले गेले. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवले गेले.

मार्च महिन्यात कोल्हापूरातील राधानगरीत आढळून आलेला वाघ आता अभयारण्याबाहेर ये-जा करु लागला आहे. या वाघाला स्थानिक म्हणता येणार नाही. अभयारण्यात वाघाचे अधूनमधून दर्शन होत असते. कोकण आणि कोल्हापूरात वाघांचा वावर असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे.

विशाल माळी, विभागीय वनाधिकारी,  कोल्हापूर वनविभाग

 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केपमध्ये, वाघ आणि इतर मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या वसाहतीसाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा आहे. काली व्याघ्र प्रकल्प आणि लगतच्या भागात प्रजननक्षम वाघांची संख्या असल्याने  या कॉरिडॉरमध्ये उत्तरेकडे वाघांची हालचाल दिसून येते. खाणकाम पुढे जाईल. या अरुंद कॉरिडॉरचे तुकडे करा आणि जंगलाच्या जमिनीवर कोणत्याही किंमतीला परवानगी दिली जाऊ नये. बॉक्साईट खाण ही पश्चिम घाटातील सर्वात विनाशकारी क्रिया आहे.

गिरीश पंजाबी, संवर्धन जीवशास्त्रज्ञ

 

  कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या वनक्षेत्रात बॉक्साईटचे उत्खनन केल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रदेशातील कॉरिडॉरचे क्षेत्र गंभीरपणे खंडित होईल. हे शेवटचे उरलेले अधिवास आहेत जे अबाधित आहेत. काही क्षेत्रे संवर्धन राखीव म्हणून संरक्षित आहेत; परंतु संवर्धन राखीव च्या बाहेरील इतर क्षेत्रांना खाणकामांमुळे धोका आहे. पेंढाकळे-मलकापूर पट्ट्यातील पाच प्रस्तावांना यापूर्वीच तत्वत: मान्यता मिळाली असून आणखी प्रस्तावांवर विचार सुरू आहे. इको-सेन्सिटिव्ह झोन देखील अद्याप मसुद्याच्या टप्प्यात आहेत आणि केंद्राने अंतिम केले नाही.

रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

 

Back to top button