डोंबिवली : स्कायवॉकवरील खूनप्रकरणी सराईत गुन्‍हेगारास जन्मठेपची शिक्षा | पुढारी

डोंबिवली : स्कायवॉकवरील खूनप्रकरणी सराईत गुन्‍हेगारास जन्मठेपची शिक्षा

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर 7 वर्षांपूर्वी चाकूने वार करून खून करण्‍यात आला हाेता. या प्रकरणी  कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी  डोंबिवलीतील एका सराईत गुन्हेगार संदीप जोगिंदर याला शुक्रवारी (दि.16)जन्मठेपेसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम भरणा केली नाही तर आणखी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भाेगावी लागणार आहे.संदीप जोगिंदर याला यापूर्वी वेगवेगळ्या खटल्यांत दोनवेळा शिक्षा झाल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. रामनगर पोलीस ठाण्याचे कर्मचा-यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

महेंद्र दळवी हे कोकणातील बिरवाडी गावचे रहिवासी होते. त्यांची बहीण डोंबिवलीत राहते. सात वर्षांपूर्वी बहिणीच्या मुलाचे लग्न असल्याने ते डोंबिवलीत आले होते. 7 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर महेंद्र डोंबिवली रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवरुन एकटेच बहिणीच्या घरी निघाले होते. त्याचवेळी निर्मनुष्य रस्‍त्‍यावर संदीप याने अडविले. त्यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. आपल्याजवळ पैसे नाहीत, आपण पाहुणे म्हणून डोंबिवलीत आलो आहे, असे सांगूनही संदीप ऐकले नाही. त्याने महेंद्र दळवी यांच्या खिश्यांची झडती घेतली. खिश्यांत त्याला काही आढळून आले नाही. यानंतर त्‍याने चाकूने दळवी यांच्यावर सपासप वार केले. यात त्‍यांचा जागीच मृत्यू झाला.

रामनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारेकरी संदीपला बेडया ठोकल्‍या. कल्याण न्यायालयात हा खून खटला तब्बल सात वर्ष सुरू होता. न्यायालयाने या प्रकरणात एकूण 7 साक्षीदार आणि एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासला. प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सराईत गुन्हेगार संदीप याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा

Back to top button