

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रांद्वारे फ्लिपकार्ट आणि अमॅझॉवरून वस्तू खरेदी करणाऱ्या एका टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यातील एक इंजिनीअर आहे. रॉबिन आरुजा (वय २८, पलावा परिसर, डोंबिवली पूर्व), किरण बनसोडे (वय २६, गणेश चौक, कल्याण पूर्व), रॉकी कर्ण ( वय २२), नावसिंग राजकुमार सिंग (वय २२), अलोक गुल्लू (वय २०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
यातील मुख्य आरोपी रॉबिन हा इंजिनिअर आहे. तर अलोक गुल्लू हा सिमकार्ड विक्रेता आहे. गुगलवरून कोणाचेही आधारकार्ड डाउनलोड करायचे. त्यावर स्वतःचा फोटो लावायचा व अमॅझॉन किंवा फ्लिपकार्ड वरून मोबाईल, लॅपटॉप असे विविध वस्तू ऑर्डर करणे हे सर्व काम रॉबिन करत होता. वस्तुंची ऑनलाईन मागणी करायची. वस्तू घरी आल्यानंतर त्या काढून घेऊन त्याच बॉक्समध्ये वस्तूच्या वजनाचे दगड भरून पॅक करायचे. व पैसे कमी आहेत नंतर घेतो, असे सांगून सांगून वस्तूचा बॉक्स परत केला जायचा. बनावट आधार कार्डवरून सिम कार्ड मिळवणे आणि त्यावरून वस्तू ऑर्डर करणे हे त्यांचे सर्रास सुरू होते. त्यांच्यावर अलिबाग, सातारा, ठाणे, पुणे, मुंबई येथील पोलिसा ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश करत त्यांच्याकडून २२ मोबाईल, १ लॅपटाॅप, १ आयपॅड, १ टॅब, २९ बनावट आधारकार्ड, २० सीमकार्ड असा एकूण ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा :