डोंबिवली : विद्यार्थ्याला बस चालकाने २५ मीटर नेलं फरफटत; कल्याण-शिळ मार्गावर विचित्र अपघात | पुढारी

डोंबिवली : विद्यार्थ्याला बस चालकाने २५ मीटर नेलं फरफटत; कल्याण-शिळ मार्गावर विचित्र अपघात

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या रिजन्सी अनंतम् संकुलासमोर रविवारी रोजी भरधाव वेगात चाललेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सदर दुचाकी बसच्या पुढील भागात अडकल्यामुळे बसने दोघा दुचाकीस्वारांना २५ मीटर फरफटत नेले. सुदैवाने दोन्ही दुचाकीस्वारांचा जीव वाचला असला तरी या अपघातात एकाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमेश इंद्रजित यादव ( वय १८) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून, तो कल्याण-शिळ मार्गावरील सोनारपाडा-शंकरानगरमधल्या पृथ्वीछाया इमारतीत राहत आहे.

याबाबतची माहिती अशी की, उमेश आपल्या मित्राच्या (क्र. एमएच ०५ ईके. ३३८९)दुचाकीवर पाठीमागे बसून रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चालला होता. या मार्गावरील रिजन्सी अनंतम् प्रवेशव्दारा समोरून जात होती. दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने आणि वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून चालक वेगाने बस चालवत होता. या बसला (क्र. एमएच ०४ एफके ३८२९ ) पुढे जाण्यासाठी इशारा करूनही भरधाव वेगात असलेल्या बसने उमेश बसलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी बसच्या एका कोपऱ्यावर अडकली. या बसने दुचाकीसह त्यावरील दोघांना २५ मीटर फरफटत नेले.

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेले पादचारी, इतर वाहन चालकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर पुढे जाऊन चालकाने बस थांबविली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. उमेश यादव याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

उमेश याच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी बसवरील बेदरकार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही बस कोणत्या संस्थेसाठी चालवली जाते?, ही बस कालबाह्य झालेली आहे का?, या बसवरील चालक अप्रशिक्षित आहे का ?, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का ?, आदी अनेक प्रश्न पोलिस तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button