पाथर्डी: शिक्षक बँकेचा वापर घोटाळ्यांसाठीः शिंदे | पुढारी

पाथर्डी: शिक्षक बँकेचा वापर घोटाळ्यांसाठीः शिंदे

पाथर्डी, पुढारी वृत्तसेवा: शासनाकडून दीडशे प्रकारची कामे शिक्षकांवर लादली जात असून, शिक्षक गप्प राहून ही कामे करतात. आगामी काळात सर्वांनी एकीने आंदोलनात सहभागी व्हावे. प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभारात गुरुकुल व गुरुमाऊली मंडळाने आर्थिक घोटाळे आणि नात्या-गोत्यांच्या फायद्यासाठी बँकेचा वापर केल्याचा आरोप सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ, साजीर आघाडीचे नेते राजेंद्र शिंदे यांनी केला. पाथर्डी येथे सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ, साजिर आघाडी या प्राथमिक शिक्षकांचा मेळाव्याप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी रवींद्र पिंपळे, आबासाहेब जगताप, नारायण राऊत, ज्ञानेश्वर माळवे, एकनाथ व्यवहारे, मीनल शेळके, गजानन ढवळे, नवनाथ तोडमल, संतोष गायकवाड, राजेंद्र कुदनर, पांडुरंग काळे, बबन गाडेकर, चंद्रकांत मोरे, सतीश डावरे, संतोष बोरुडे, बाबा आव्हाड, संतोष सरोदे, मोहन शिंदे, आबा लोंढे, धर्मा बडे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बँकेची निवडणूक कधीही लागू शकते. सत्ताधारी गुरुकुल मंडळ हे खर्‍या अर्थाने पैशांवरचे मंडळ आहे. उमेदवारी देताना पैसे घेतले जातात. पुरस्कारार्थींकडून पैसे घेण्याचे उद्योग सुरू आहेत. गुरुमाऊली मंडळाचे सहकारी फक्त नात्यागोत्यांच मंडळ आहे. स्वराज मंडळातील अशोक खेडकर, ज्ञानेश्वर केदार, दिलीप खेडकर व अपंग संघटनेचे संतोष सरोदे यांचा सदिच्छा मंडळात प्रवेश झाला. यावेळी बप्पासाहेब शेळके, कल्याण कराड, दत्तात्रय गोपाळ, अशोक कुसळकर, प्रशांत शेळके, अमोल भंडारी, महादेव गोल्हार, अशोक गायकवाड, महादेव शिरसाट आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष खेडकर, सूत्रसंचालन गहिनीनाथ शिरसाट यांनी करुन अनिल कराड यांनी आभार मानले.

Back to top button