

मंचर; पुढारी वृत्तसेवा: एकलहरे येथील शिंदेवाडी वस्तीवर धुमाकूळ घालणारी बिबट्याची मादी वन खात्याने लावलेल्या पिंजर्यात जेरबंद झाली. गेल्या आठ दिवसांपासून या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. पशुधनावर हल्ला करून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. त्यामुळे शेतकरी शेतात जायला घाबरत होते. शेतकरी जगदीश शिंदे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच नवनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, माजी सरपंच आनसू शिंदे, दत्तात्रय शिंदे यांनी केली होती.
त्यानुसार वनविभागाने पिंजरा लावला. त्यात रविवारी (दि. 4) रात्री अकराच्या दरम्यान तीन वर्षे वयाची बिबट्याची मादी कैद झाली. वनविभागाचे अधिकारी एस. एस. तांदळे, वनपाल एस. जी. मडके यांनी पाहणी करून सदर बिबट्याची मादी माणिकडोह येथे पाठवून दिली. बिबट्याच्या मादीला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे माजी उपसरपंच नवनाथ शिंदे यांनी सांगितले.