ठाणे : एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या | पुढारी

ठाणे : एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने भरधाव रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना कल्याण-कसारा मार्गावरील शहाड रेल्वे स्थानकाजवळ १७ ऑगस्टला घडली होती. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सनी बैसाने (22, रा. उल्हासनगर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येला ब्लॅकमेल करणारी एक तरूणी जबाबदार असल्याचा संशय विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी शहाड स्थानकाजवळ ही घटना घडली होती. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. सनीने बीएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एपपीएससीची त्याने जोरदार तयारी सुरू केली होती. कोणत्याही परिस्थितीत अधिकारी होण्याचे त्याने स्वप्न बाळगले होते. याच दरम्यान त्याच्या आयुष्यात एक तरूणी आली. या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र या तरुणीने पैसे, दागिने आणि लग्न करण्यासाठी त्याच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. या तणावातूनच त्याने आत्महत्या केली. असे सनीच्या नातेवाईकांनी सांगितले. शहाड रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी भरधाव वेगाने आलेल्या मालगाडी समोर सनीने उडी मारत आत्महत्या केली. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद झाली आहे. सनीच्या आत्महत्येला त्याला ब्लॅकमेल करणारी तरुणी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधीत तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button