सिक्स पॅक अ‍ॅब्ज, जास्त प्रोटिन्सयुक्त पदार्थांमुळे शरिरावर होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम | पुढारी

सिक्स पॅक अ‍ॅब्ज, जास्त प्रोटिन्सयुक्त पदार्थांमुळे शरिरावर होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

आरोग्यासाठी प्रथिनांचे महत्त्व आपल्याला शालेय शिक्षणापासूनच सािंंगतले जात असते. त्यामुळे जी मंडळी आपले शरीर तंदुुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात, ते आपल्या आहारामध्ये प्रोटिन्सचा समावेश कटाक्षाने करतात.

ज्यांना आपले वजन लवकर कमी करण्याची घाई असते, असे लोक भरपूर व्यायाम केल्यावर भरपूर प्रोटिनयुक्‍त आहार घेणे पसंत करतात. आहारात प्रोटिन्सचा भरपूर प्रमाणात समावेश असेल, तर आपली पचनशक्‍ती चांगली राहण्यास मदत होते. यामुळेच आहारात प्रोटिन्सचा समावेश आवर्जून केला जातो; पण अलीकडेच झालेल्या वैद्यकीय संशोधनानुसार दीर्घकाळ जास्त प्रमाणात प्रोटिन्स पुरवठा शरीराला झाला, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. अधिक प्रमाणात प्रोटिन्स असलेले अन्‍न पदार्थ सातत्याने खाल्ल्यास आपल्या हृदयावर, मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतो. आपल्या शरीराला पौष्टिक घटकांचा पुरवठा व्हावा या हेतूने प्रोटिनयुक्‍त आहार घेतला जातो; मात्र असा आहार प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास शरीरातील अंतर्गत अवयवांवर त्याचे विपरीत परिणाम होताना दिसतात. जीम जाऊन अथवा दररोज चालण्यास अथवा पळण्यास जाऊन आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांमध्ये प्रोटिन्सयुक्‍त आहाराविषयी मोठे आकर्षण जाणवून येते. वेगवेगळ्या जाहिरतींसाठी जे मॉडेल म्हणून काम करतात अशांच्या मजबूत शरीरयष्टीचे आकर्षण अनेकांना असते.

सध्या किती पॅक अ‍ॅब्जची शरीरयष्टी आहे याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सलमान खान, आमिर खान यासारखे चित्रपट कलाकार आपली दंडकट शरीरयष्टी चित्रपटांमधून दाखवत असतात. चित्रपट कलाकारांची अशी शरीरयष्टी पाहून आपणही या कलाकारांप्रमाणे शरीरयष्टी मिळवावी, अशी अनेकांची इच्छा असते. याकरिता अशी मंडळी कोणाच्या तरी सल्ल्यानुसार आपल्या आहारात प्रोटिन्सचा समावेश मोठ्या प्रमाणात करू लागतात; मात्र असे करणे आरोग्याच्या द‍ृष्टीने धोकादायक ठरू शकते, असे आरोग्य विषयक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी झालेल्या वैद्यकीय संशोधनात असे दिसून आले आहे की, प्रमाणापेक्षा प्रोटिन्सचे सेवन आधिक झाले, तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

शरीरातील प्रोटिन्सचे प्रमाण वाढल्यास शरीरात किटोन्सचे प्रमाणही वाढते. किटोन्स हा घटक विषद्रव्य म्हणून ओळखला जातो. हे विषद्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. असे करताना शरीरातून आधिक प्रमाणात पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे डीहायड्रेशनची समस्या जाणवण्याची शक्यता असते. जे आपले वजन कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात व्यायाम करतात त्यांना डीहायड्रेशनची समस्या जास्त प्रमाणात जाणवत असते. कारण, अधिक व्यायाम केला, तर शरीरातून जास्त प्रमाणात पाणी घामावाटे बाहेर टाकले जाते. तेवढे पाणी शरीरात परत न गेल्यास जादा व्यायाम करणार्‍या लोकांना डीहायड्रेशन होण्याचा धोका असतो. डीहायड्रेशन झाल्यास त्या व्यक्‍तीला चांगलाच अशक्‍तपणा जाणवू लागतो. वारंवार चक्कर येते, तसेच श्‍वासातून दुर्गंधी येऊ लागते. ज्यांना मूत्रपिंडविषयक आजार आहेत अशा रुग्णांना प्रोटिन्सचे भरपूर प्रमाण असलेल्या आहारापासून दूर राहण्याचा सल्ला वैद्यकीय संशोधकांनी दिला आहे. रक्‍तामधील प्रोटिन्सला शुद्ध करण्याचे काम मूत्रपिंडाद्वारे केले जाते. प्रोटिन्स अधिक प्रमाण असलेला आहार घेतल्यास आपल्या मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो, असे वैद्यकीय संशोधनातून आढळून आले आहे.

एका विशिष्ट वयानंतर भरपूर प्रोटिन्स असलेला आहार घेतला, तर शरीरातील युरिया अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. मूत्रातून कॅल्शियम बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढू लागते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यास किडनीवर ताण पडतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ज्यांना हाडांची दुखणी आहेत अशा रुग्णांनीही अधिक प्रमाणात प्रोटिन्स असलेले अन्‍नपदार्थ खाऊ नयेत असा सल्ला वैद्यकीय संशोधक देत आहेत. प्रोटिन्स ग्रहण करण्यासाठी अधिक प्रमाणात कॅल्शियमची गरज असते. अशावेळी शरीर मांसपेशी आणि हाडांमधील कॅल्शियम शोषून घेणे चालू करते. शरीराला प्रोटिन्सचा पुरवठा भरपूर प्रमाणात व्हावा, याकरिता जे लोक सातत्याने मांसाहार घेत असतात अशा लोकांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास त्या व्यक्‍तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्या व्यक्‍तीला मस्तिष्काघात (स्ट्रोक) होण्याचीही दाट शक्यता असते, असे वैद्यकीय संंशोधकांचे म्हणणे आहे. कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी झाले, तर शरीराला फायबरचा कमी पुरवठा होतो. फायबरचा पुरवठा कमी झाला, तर आपल्या शरीरातील पचनशक्‍ती बिघडू शकते.

बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू लागते. अनेक जण तब्येत चांगली राहावी म्हणून व्यायामाच्या काळात दररोज 8-10 अंडी खात असतात, तसेच चिकन, मटण यावर ताव मारत असतात. याचेही परिणाम चांगले होत नाहीत, असे वैद्यकीय संशोधकांचे म्हणणे आहे. प्रोटिन्सचे प्रमाण अधिक झाले, तर हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते. तसे झाल्यास हाडे ठिसूळ आणि कमकुवत होऊ लागतात. फळभाज्या, फळे, भाजीपाला, वनौैषधी, यातून मिळणारे प्रोटिन्स शरीरामधील हाडे बळकट करतात; मात्र चिकन, मटण, अंडी यातून जी प्रोटिन्स शरीरात जातात त्यामुळे हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे दिसते. जे लोक केवळ शाकाहारी आहेत व जे लोक भरपूर व्यायाम करतात अशा लोकांना प्रोटिन्सचा फायदा होतो; मात्र स्टेरॉईडयुक्‍त प्रोटिनमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होते. त्याचा किडनी आणि लिव्हरच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो, असे संशोधनात दिसून आले आहे.

  • डॉ. संतोष काळे

Back to top button