स्वार्थी राजकारणासाठी ‘गोकुळ’च्या बदनामीची चर्चा संघाला मारक : प्रा. जालंदर पाटील | पुढारी

स्वार्थी राजकारणासाठी 'गोकुळ'च्या बदनामीची चर्चा संघाला मारक : प्रा. जालंदर पाटील

राशिवडे : पुढारी वृतसेवा : रात्रदिवस काबाडकष्ट करुन चांगल्या गुणवत्तेचे दूध बळीराजा ‘गोकुळ’कडे पाठवित असतो. परंतु राजकीय स्वार्थासाठीच याच दुधाच्या गुणवत्तेची बदनामीची चर्चा संघालाच मारक ठरत आहे. गुणवत्तेचे दुध पाठविणाऱ्या बळीराजाचा हा अपमान आहे. ‘गोकुळ’च्या काखेत कुणी बसायचं यासाठीच्या भांडणामध्ये  गोकुळच्या गुणवत्तेला बदनाम करु नका. बल्क कुलर सेंटरवर सुरु असणाऱ्या कारभारामुळेही बदनामी वाढत आहे, असा आरोप स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

पाटील पुढे म्हणाले, गोकुळच्या कारभाराबद्दल तुम्ही ईडी, सीबीआयसह अन्य चौकशींचे सत्र लावा. पण राजकीय स्वार्थासाठी सामान्यांच्या घरात नांदणाऱ्या गोकुळची नाहक बदनामी करु नका. सभासदवर्ग गुणवत्तेच्या दुधाचा पुरवठा संघाकडे करत असतो. परंतु, या दुधाच्या गुणवत्तेबाबत होणाऱ्या नाहक चर्चा संघाला मारक ठरत आहे. शिवाय गुणवत्तेचा दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या अपमानास्पद आहेत. पशुखाद्य विभाग तोट्यात असताना खाद्याची वारंवार दरवाढ का केली जात आहे?

गोकुळ ही जिल्ह्याची शिखरसंस्था, आर्थिक धमनी आहे. संचालकांना महिन्यापोटी कितीचे पाकीट दिले जाते? ठरावधारकांना किती दिले? याची माहिती आम्हाला आहे. अन्य राज्यामध्ये दुधाचे ब्रॅण्ड आहेत. त्याप्रमाणेच गोकुळ राज्याचा ब्रॅण्ड व्हावा. गोकुळचे दैनंदिन १४ लाख लिटर दूध कलेक्शन होते. यामधील ८ लाख लिटर मुंबईत, ४ लाख लिटर पुणे तर २ लाख लिटर दुधाची अन्यत्र विक्री होते. राज्यात अपेक्षित दुधाचे उत्पादन होत नसल्याने परराज्यातील दूध विक्रीसाठी राज्यात येत आहे. त्यामुळे दुधवाढीसाठी अधिक भर द्यावा. यावेळी ‘भिमानी’ जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, भीमराव गोनुगडे, रमाकांत तोडकर, मारुती पाटील, नामदेवराव गोंगाणे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्याच्या वेदना कळतील..

सताधारी नेत्यांनी दूध वाढीसाठी चांगला, स्वागतार्ह निर्णय घेतल्याचे समजते. नेत्यासह सर्व संचालक, सर्व कर्मचारी वर्ग एक लाख म्हशी घेऊन पाच लाख लिटर दूध वाढविणार आहे. यामुळे आता तुम्ही शेणघाण काढा, धारा काढा तरच शेतकऱ्यांच्या वेदना, त्रास तुम्हाला समजतील.

Back to top button