ठाणे : शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या दोन वयोवृद्ध आजींची फसवणूक; एक लाखाचा ऐवज लुटला | पुढारी

ठाणे : शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या दोन वयोवृद्ध आजींची फसवणूक; एक लाखाचा ऐवज लुटला

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : आपल्या नातवांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या दोन वयोवृद्ध आजींची तीन अनोळखी चोरट्यांनी वेगवेगळ्या वेळेत फसवणूक करुन सुमारे एक लाखाचा ऐवज लुटून नेला. ही घटना पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेच्या बाहेरील रोडवर घडली. सुरेखा नाचणकर (वय ७०, रा. समर्थ कृपा चाळ, सरोवरनगर, डोंबिवली पश्चिम), भामाबाई जाधव (वय ७२, रा. ओमशांती निवास, जयहिंद कॉलनी, डोंबिवली) अशी फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरेखा नाचणकर या आपल्या नातवाला महात्मा फुले रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत सोडण्यासाठी सकाळी दहा वाजता गेल्या होत्या. मुलाला शाळेत सोडल्यानंतर त्या रस्त्यावर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात दोन अनोळखी इसमांनी संगनमत करुन सुरेखा यांना संम्मोहित करुन त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. यानंतर त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्या गळ्यातील ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम काढून घेतली. घरी गेल्यानंतर सुरेखा यांना गळ्यात मंगळसूत्र जवळील पैशाचा बटवा गायब असल्याचे दिसले.

दुसरा प्रकार त्याच दिवशी सकाळी साडे अकरा वाजता तक्रारदार भामाबाई जाधव यांच्या बाबतीत घडला. नातवाला गांधी विद्यामंदिर शाळेत सोडल्यानंतर त्या रिक्षाने घरी जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी भामाबाई यांना तीन भामट्यांनी बोलण्यात गुंतवणूक त्यांना संम्मोहित करुन त्यांचे लक्ष विचलित केले. त्यांच्या गळ्यातील ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घेवून पोबारा केला. या दोन्ही लुटीप्रकरणी मंगळवारी (दि.१६) रोजी सकाळी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोघींनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button