अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार : आरोपीला सिनेस्टाइल पकडले | पुढारी

अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार : आरोपीला सिनेस्टाइल पकडले

अमरावती; पुढारी वृत्तसेवा: अकोला येथून पळून आलेल्या आरोपीचा पाठलाग करीत अमरावतीत पोहोचलेल्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार केला. ही धक्‍कादायक घटना लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी (दि.१५ ) सकाळी घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अकोला पोलिसांनी प्राणांची बाजी लावत आरोपीला सिनेस्टाइल अटक केली.

अकोला स्थानिक पोलिसांना हवा असणारा आरोपी राजेश सुभाष राऊत हा अमरावतीत असल्याची माहिती मिळतात अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज सकाळी लक्ष्मीनगर परिसरात पोहोचले.  राजेश राऊत याने थेट बंदूक उचलून पोलिसांच्या वाहनाच्या समोरच्या चाकावर गाेळी झाडली. त्यानंतर तेथून पळ काढला. दरम्यान, वाहनातून उतरून पोलीस राजेशाच्या मागे धावले आणि मोठ्या शिताफीने त्याला पकडले. यानंतर त्याला गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

जुन्या अकोला शहरात गजानननगर परिसरातील रहिवासी असणारा राजेश राऊत याच्यावर २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत. अकोला पोलीस त्याचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. राजेश बुलडाण्यात असल्याची माहिती कळताच अकोल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलडाण्यात पोहोचले होते. पोलीस आल्याचे कळताच राजेश बुलडाण्यावरून अमरावतीला पळून आला. दरम्यान, अकोला पोलिसांनी बुलडाण्यावरून अमरावतीपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि आज त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button