डोंबिवली : फाेटाे लावण्‍यावरुन शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्‍ये राडा | पुढारी

डोंबिवली : फाेटाे लावण्‍यावरुन शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्‍ये राडा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावणे आणि शाखा ताब्यात घेणे यावरून राडा झाला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर युती करून मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट झाल्याचे निदर्शनास येत आहे.

एकनाथ शिंदेंचा फाेटाे लावण्‍यासाठी समर्थक आक्रमक

नेमकी शिवसेना कोणाची? यावरून वाद सुरू असतानाच मध्यवर्ती शाखेत असणारे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो काढण्यात आले होते. मात्र आज हे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटाची काही माणसे मध्यवर्ती शाखेत आले. त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांना भिडताना पाहायला मिळाले.

समर्थकांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ

४०० ते ५०० जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिक असे सगळ्याच वयोगटातील शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले. रामनगर पोलिस याठिकाणी पोहोचले खरे. मात्र त्यांनाही बराच वेळ परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला .

दोन दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाल रोडवरील शाखेत ठाकरे गटातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा बॅनरवर फोटो नसल्याने वादावादी केली होती. त्यानंतर शाखा प्रमुख परेश म्हात्रे यांनी विवेक खामकर यांच्यावर १५ हजार रुपये चोरी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केला होता. त्यांनतर विष्णू नगर पोलिसांनी नव निर्वाचित शहर प्रमुख विवेक खामकर यांना अटक केली होती.

हेही वाचा : 

Back to top button