ठाणे : पांढरी भेंडी वधारली ; प्रति किलो १५० रुपये दर,शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ | पुढारी

ठाणे : पांढरी भेंडी वधारली ; प्रति किलो १५० रुपये दर,शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'

नेवाळी (ठाणे) : शुभम साळुंके :  श्रावण महिना सुरू झाला की, खवय्यांना माळरानावर उगवणाऱ्या रान भाज्यांचे वेध लागतात. अंबरनाथ तालुक्यात काकडवाल आणि कुंभार्ली गावातील माळरानावर या दिवसांमध्ये ९ आरी भेंडीचं उत्पादन घेतले जाते. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या भेंडीच्या तुलनेत या भेंडीला पांढरी झलक असते. चवीला देखील ही भेंडी वेगळी असल्यामुळे या दिवसांमध्ये पांढऱ्या भेंडीला जास्त मागणी असते. माळरानांवर कमी उत्पादन घेतल्या जाणाऱ्या या भेंडीला यंदा प्रति किलोला १५० रुपयांचा दर मिळाला आहे.

सफेद भेंडीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात माळरानांवर विविध फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी अधिक असल्याने भेंडी, पडवळ, शिरोळे, घोसाळे, वांगे यांचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जाते. मात्र यंदा या सर्व भाज्यांमध्ये सफेद भेंडीचा बाजारात दर हा सर्वाधिक वाढलेला दिसून आला आहे. बाजारात शेतकऱ्यांकडून सफेद भेंडी प्रति किलो १५० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे यंदा सफेद भेंडीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत.

भेंडीची भाजी आयुर्वेदिक असल्याने अनेक जण हे भेंडीच्या भाजीला पावसाळ्यात आपल्या ताटात अधिक महत्व देत असतात. बाजारात आलेली ही पांढरी भेंडी आरोग्यासाठी चांगली असते. पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून पांढऱ्या भेंडीच्या भाजीचा सर्वाधिक जेवणाच्या ताटात समावेश केला जातो, म्हणून या दिवसांमध्ये भेंडीला चांगली मागणी असते. परंतु फार कमी ठिकाणी ही भेंडी पिकवली जात असल्यामुळे यंदा बाजारात या भेंडीचे दर चांगलेच तेजीत आहेत. एकीकडे इतर भाज्यांसाठी शेतकऱ्यांना तुटपुंजे पैसे मिळत असताना पांढऱ्या भेंडीच्या दरांनी १५० रुपये प्रति किलोला गाठल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.

मुरबाड परिसरासह अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात लागवड

सफेद भेंडीची लागवड सर्वच ठिकाणी केली जात नाही. मुरबाड परिसरात आणि अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात या भेंडीची लागवड केली जाते. दरवर्षी या भेंडीचे उत्पादन कमी प्रमाणात होत मिळत आहे. मात्र असं असतानाही भेंडीच्या विक्रीला मात्र चांगले दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

Back to top button