बाजारतळाला आले नाल्याचे स्वरूप; बाजारात बसायचे कोठे हा शेतकर्‍यांचा प्रश्न | पुढारी

बाजारतळाला आले नाल्याचे स्वरूप; बाजारात बसायचे कोठे हा शेतकर्‍यांचा प्रश्न

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: शिर्सुफळ (ता. बारामती) येथील आठवडे बाजार हा शुक्रवारी भरतो, परंतु रिमझिम पावसानेच आठवडे बाजारात पाणी साचल्याने शेतकर्‍यांनी बाजारात कोठे बसायचे आसा सवाल आता शेतकरी करत आहेत. शिर्सुफळ ते आटोळे वस्तीवरील पुलाचे काम सुरू असून ते काम अर्धवट झाले आहे. त्याठिकाणी तंबू टाकल्याने त्याचा फुगवटा तयार होऊन पावसाचे पाणी ओढ्यातून न जाता बाजारतळात साचून राहात असल्याने शेतकरी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

संबंधित ठेकेदार व अधिकारी याला जबाबदार असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. शिर्सुफळ परिसरात तसेच वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी आपला शेतात पिकवलेला माल हा आठवडे बाजारात विकायला आणतात. तो विकून जे दोन पैसे शिल्लक राहतात, त्यावर घरखर्च भागवावा लागतो. परंतु बाजारतळच पाण्याखाली असेल तर दुकाने लावायची कोठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शुक्रवारी आठवडे बाजारात असतो. बाजारतळच जर पाण्यात असेल तर आम्ही भाजीमंडईचे दुकान लावायचे कोठे व घेतलेला भाजीपला कसा विकायचा? प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करून पाणी साचणार नाही याची दखल घ्यावी.

                                                                    – किरण हिवरकर, शेतकरी

Back to top button