Eknath Shinde : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फेरीवाल्यांना आधार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

Eknath Shinde : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फेरीवाल्यांना आधार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या फेरीविक्रेत्यांवर अनिष्ट परिणाम झाला होता. मात्र पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला. पंतप्रधानांच्या या योजनांमुळे अनेकांचे संसार वाचले व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी कल्याण-डोंबिवलीतील पथ विक्रेत्यांसाठी आयोजित स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवाप्रसंगी दूरदृश्य प्रणाली अर्थात ऑनलाईनच्या माध्यमातून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही माहिती दिली.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगरपरिषद प्रशासनाचे रोहिदास दोरकुळकर, केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाचे वैभव खानोलकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक रवी पाटील, भाजपाचे प्रेमनाथ म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते.

(Eknath Shinde) पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमुळे फेरीवाले, पथविक्रेते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येत आहे. फेरीवाल्यांनाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदत करावी. त्याचबरोबरच नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी, असेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वनिधी योजनेचे चांगले काम केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेला सर्वतोपरी मदत केली जाईल. नागरिकांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना केले.
कोरोनामुळे रोजगार गेलेल्या सर्वसामान्यांना मदत व्हावी, यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे. त्याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध आठ योजनांमुळे अनेकांना लाभ झाला आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याचे कामही विमा योजनेमुळे झाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. जास्तीजास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फेरीवाल्यांचा गोंधळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण संपल्यानंतर फेरीवाल्यांनी आमचेही ऐकून घ्या, अशा घोषणा दिल्या. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने संतापलेल्या फेरीवाल्यांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. कर्ज दिले, प्रोत्साहन दिले, योजना राबविल्या, मात्र आम्ही व्यवसाय करायचा तरी कोठे ? असा संतप्त सवाल यावेळी फेरीवाल्यांनी उपस्थित केला. त्यानंतर सुरू असलेला कार्यक्रम सोडून घोषणाबाजी करत फेरीवाले नाट्यगृहाबाहेर पडले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाबाहेर येताच फेरीवाल्यांनी समस्यांचा पाढा वाचत त्यांना निवेदन दिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button