रत्नागिरी : संभ्रम निर्माण करण्यापेक्षा उघड उघड सांगा; बाळा कदम यांचे बॅनर लावणार्‍यांना आव्हान | पुढारी

रत्नागिरी : संभ्रम निर्माण करण्यापेक्षा उघड उघड सांगा; बाळा कदम यांचे बॅनर लावणार्‍यांना आव्हान

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी आलेल्या महापुरानंतर मदतीसाठी शिवसेनेसह दीडशेहून अधिक विविध धार्मिक व सेवाभावी संस्थांनी मोलाची मदत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही महापुरानंतरची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लक्ष ठेवून होते. केवळ एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून चालणार नाही. शहरात झळकलेल्या बॅनरबाजीशी शिवसेनेचा सबंध नाही. त्यामुळे लोकांच्यात गैरसमज पसरविण्याचा हा प्रकार आहे. असे करण्यापेक्षा उघड सांगा, असे थेट आव्हान शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झालेल्या बॅनरबाजी विषयी बाळा कदम पत्रकार परिषदेत म्हणाले, चिपळूणमध्ये गतवर्षी उद्भवलेल्या महापुरात एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी दिले किंवा अन्य जीवनावश्यक वस्तू व साहित्य दिले होते. परंतु, ही मदत त्यांनी एकट्याने केली नव्हती. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार विनायक राऊत यांच्या सांगण्यानुसार मुंबई महानगरपालिकेने मदत केली. एवढेच नव्हे तर चिपळुणला अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी सहकार्य केले. चिपळूण पालिकेच्या सफाई कामगारांचेही तितकेच योगदान आहे. या सर्वांचे ऋण फेडायला हवेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त याविषयी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरले होते. परंतु, त्या आधीच शहरप्रमुखांनी बॅनरबाजी केली. त्यावर शहरातील काही कार्यकर्त्यांसह सेना नेत्यांचे फोटो आहेत. या फलकाविषयी शिवसेनेचा काही संबंध नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना प्रमोट करणारा फलक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच काढला आहे. तो फलक काढण्याचे आदेश जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिले होते. फलकावर सेना नेत्यांचेही फोटो असल्याने शिवसैनिकांनी तो न फाडता सन्मानाने योग्यरित्य काढून ठेवला. शहरप्रमुख उमेश सकपाळ अजूनही पदावर आहेत. ज्यांना जी भूमिका घ्यायची आहे, ती जाहीरपणे घ्यावी. फलकबाजीतून शिवसेनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने हे फलक काढण्यात आलेले आहेत.

उमेश सकपाळ यांना शिवसेनेत अजूनही संधी आहे, हे त्यांना कळलेले नाही. त्यामुळेच त्यांच्या या वर्तनाविषयी दखल घेण्यात आली असून त्यावर आज पक्ष कार्यकारिणीची बैठक घेऊन जिल्हा प्रमुख सचिन कदम निर्णय देतील, असे बाळा कदम यांनी सांगितले. यावेळी राजू देवळेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button