शिवसेनेच्या लाऊडस्पीकर समोर विरोधकांच्या पीपाण्या टिकणार नाहीत : संजय राऊत | पुढारी

शिवसेनेच्या लाऊडस्पीकर समोर विरोधकांच्या पीपाण्या टिकणार नाहीत : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अधीच झाला होता, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. हा खोटारडेपणाचा कळस आहे. शिवसेनेचा लाऊड स्पीकर गेली ५६ वर्षे सुरू आहे. आमच्या लाऊड स्पीकर समोर तुमच्या पीपाण्या टिकणार नाहीत. शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान राऊत यांनी केले आहे.

मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर राऊत यांनी चंद्रकात पाटील यांचे अभिनंदन केले. भारतीय जनता पक्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तरीही चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांनी कोल्हापूरचा बाणा दाखवला आणि जे पोटात मळमळत होतं ते ओठावर आणले आणि नंतर खुलासा करावा लागला. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करायला पाहीजे, असा चिमटा देखील राऊत यांनी काढला.

भाडोत्री भोंगे आणि लाऊड स्पीकर यामध्ये फरक आहे. शिवसेनेचा लाऊड स्पीकर ५६ वर्षे सुरू आहे. स्पिकरची गर्जना कायम राहील. हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. तो कोणी बंद करू शकत नाही. उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडतील, प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश हा एक लाऊड स्पीकर आहे. तो तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर कोणतीही कारवाई करा फडणवीस तुमची सगळी कारस्थाने मला माहीत आहेत, असे आव्हान राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

हेही वाचा :

Back to top button