खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  | पुढारी

खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : खड्डे बुजविण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावेत. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करेल. तसेच खड्डे भरण्यासाठी दर्जेदार सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरावेत, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संदर्भात मुंबई येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्वाच्या महामार्गांवर तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए व एमएसआरडीसीसह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई, शीळ फाटा, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी शिंदे म्हणाले की, वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या. वाहतूकीची कोंडी आणि खड्डे यातून लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा. रस्ता कोणाचा आहे हे लोकांना माहित नसते. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना चांगली माहिती असते. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांकडून माहिती घ्या. पोलिसांनीही या यंत्रणांच्या संपर्कात राहून रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. जेएनपीटी आणि अहमदाबाकडून येणाऱ्या वाहतूकीचे नियंत्रण करा. एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांनी त्यांचे अंतर्गत रस्तेही खड्डे मुक्त राहतील, याची काळजी घ्यावी. वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी दीर्घकालीन असे नियोजन करा. बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास, सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारच्या नियोजनासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात यावा. यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी, संबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे, असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button