भर पावसात नान्नजचा रथ यात्रोत्सव उत्साहात | पुढारी

भर पावसात नान्नजचा रथ यात्रोत्सव उत्साहात

नान्नज : पुढारी वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यात धाकटी पंढरी म्हणून ओळख असणार्‍या नान्नजच्या आषाढी रथयात्रेला अनेक वर्षांची परंपरा असून, गुरुपौर्णिमेला आषाढी रथ यात्रा उत्सव आयोजित केला. पांडुरंगाच्या नावाचा गजर करत हजारों भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. मतदारसंघातील दोन आमदारासह जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत रथाचे मनोमन दर्शन घेऊन भाविकांचे लक्ष वेधले.

नर्तिकांच्या डावांनी अनेक तरुणांना आपल्या अदाकारीने मंत्रमुग्ध केले. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा यात्रोत्सव होत असल्याने अनेक शौकिनांनी नर्तिकांवर पैशांची उधळण केली. यात्रोत्सवात  कोणताही अनुचित प्रकार न घडता रथयात्रोत्सव शांततेत पार पडला.
गुरुपौर्णिमेला दुपारी 12 वाजता पाडुरंगाची आरती करून रथातून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेऊन नवस फेडून रथाला नारळाची तोरणे बांधले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी आरतीच्या वेळी हजेरी लावून रथाचे दर्शन घेतले. आमदार रोहित पवार यांनीही रथाचे दर्शन घेतले. खर्डा गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणारे प्रा. सचिन गायवळ यांनी शक्तिप्रदर्शन करत दर्शन घेतले. दोन्ही आमदारांनी रथासाठी आवर्जून हजेरी लावून रथाचे दर्शन घेतल्याने  भक्तांच्या भुवया उंचावल्या, तर काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके….या गीतावर नर्तिकांनी मोठी अदा सादर केली.

नान्नज येथील रथ तीन मजली असून साग लाकडापासून बनविला असून, या रथाला दोर बांधून हजारो भाविक हा रथ ओडतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही कायम आहे.   गोपाळपुरा प्रांगणात नर्तिकांचे डाव पाहण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड उडाते; मात्र यंदा सतत पाऊस असल्याने नर्तिकांचे डाव उभे ठाकले नाही. गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी गोपाळपूरा येथून रथ बाजारतळावर आला. भाविकांसाठी दर्शनासाठी रथ रात्रभर उभा होता.

दुसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा रथ बाजारतळापासून विठ्ठल मंदिराकडे नेहण्यात आला. येथे मंडळातील कलाकारांसह नर्तिकांनी शेवटची कला सादर केली. यावेळी सरपंच महेंद्र मोहळकर, युवा नेते उदय पवार, उत्सव समितीचे नागनाथ कोळपकर, सुधाकर कोळपकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोहळकर, लियाकत शेख, दिलीप मोहळकर, अतुल मलंगनेर, भाऊसाहेब कोळपकर आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, माजी सरपंच संतोष पवार, नंदकुमार कोळपकर, दादा दळवी, हनुमंत ढाळे, राखा गोरे आदी उपस्थित होते.

Back to top button