भाईंदर : संगीत विद्यालयासाठी शासनाकडून 5 कोटींचा निधी वर्ग

भाईंदर : संगीत विद्यालयासाठी शासनाकडून 5 कोटींचा निधी वर्ग

भाईंदर पुढारी वृत्तसेवा : मिरा-भाईंदर महापालिकेच्या आरक्षण क्रमांक 246 वर भारतरत्न स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 5 कोटींचा निधी वर्ग करण्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

या विद्यालयाच्या निर्मितीसाठी सरनाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून विद्यालयासाठी निधी मंजूर व्हावा, अशी मागणी देखील केली होती. ती मंजूर करण्यात आल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने त्याचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यात महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखा शीर्षकांतर्गत पालिकेला पहिल्या टप्प्यातील 5 कोटींचा निधी वर्ग केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, अशी मागणी सुरू असताना लता मंगेशकर यांचे स्मरण कायम होत राहील, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेच्या खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या आरक्षण क्रमांक 246 वर लता मंगेशकर संगीत विद्यालय शासनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या विद्यालयासाठी सुमारे 50 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा निधी शासनाने पालिकेला द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. ती मान्य करीत शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या बांधकामास मंजुरी दिली असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी 5 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. हा निधी पालिकेला वर्ग करण्यात आल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला असून त्याचे बांधकाम पालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

राज्यातील पहिले विद्यालय; आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा

विद्यालयाच्या एकूण खर्चापैकी 75 टक्के खर्च राज्य शासनाकडून तर 25 टक्के खर्च पालिकेकडून केला जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तत्पूर्वी या विद्यालयाचे डिझाईन तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालय बांधकामाची निविदा प्रक्रिया याच वर्षात सुरू केली जाणार असून हे संगीत विद्यालय राज्य शासनाकडून मुंबईत नियोजित असलेल्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जेणेकरून शहरातील उद‍्योन्मुख गायकांना त्याचा फायदाहोऊन विद्यालयाच्या माध्यमातून नवे संगीतकार निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला आहे. राज्य शासनाने मिरा-भाईंदर शहरात पहिलेच संगीत विद्यालय सुरू करण्यास मान्यता दिल्याने ते राज्यातील पहिले विद्यालय ठरल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेत्यांची राज्यपालांकडे तक्रार

याबाबत पालिकेला निधी वर्ग झाला किंवा नाही त्याची चौकशी केली असता अद्याप तसा कोणताही निधी पालिकेकडे वर्ग करण्यात आला
नसल्याचे समोर आले. तसेच सध्याच्या राज्यातील राजकीय बंडाळीचा गैरफायदा घेत शासनाकडून विविध निर्णय घेतले जात असून त्याची परिपत्रके काढली जात असल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी तक्रार करीत त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news