कल्याण, पुढारी वृत्तसेवा : एका कंपनीत कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगाराचे त्याच कंपनी मालकाच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध होते. मात्र मालकाच्या पत्नीचे आणखीन तिसऱ्या कोणाबरोबर तरी प्रेमसंबंध आहेत, असा संशय कामगाराला आला. हा संशय मनात ठेवून मालकाच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या एका कामगाराला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी जन्मठेप आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा मनोरंजन उर्फ राखाल सिध्देश्वर महाकुड असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून डोंबिवलीतील ॲड. सचिन कुलकर्णी यांनी प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू, साक्षी पुरावे तपासून आरोपीला शिक्षा ठोठावली. जन्मठेप झालेला कामगार अंबरनाथ मधील एका कंपनीत काम करत होता. या कंपनी मालकाच्या घरासमोरच कामगार राहत होता. काही कामानिमित्त कामगाराची मालकाच्या घरी ये-जा असे. या ओळखीतून कामगार आणि कंपनी मालकाच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
सहा वर्षापूर्वी होळीच्या दिवशी तुम्ही आणि मुली होळी खेळा मला बरं वाटतं नाही असे तिने पतीला सांगितले. यावेळी बाहेर होळी खेळताना पती आपल्या दोन्ही मुलींना घेऊन अंबरनाथ मध्येच राहणाऱ्या मामाकडे गेले होते. दरम्यान हा कामगार मालकाच्या घरी आला. इतक्यात मालकाच्या पत्नीला कोणाचातरी फोन आला. हा फोन तिसऱ्याच माणसाचा असून त्याच्याबरोबरपण हीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय कामगाराला आला. त्यानंतर त्याने त्या महिलेचा खून केला. मनोरंजनने खून केल्याचे साक्षी पुराव्यावरून सिध्द झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला सुनावणीला आल्यानंतर न्यायालयाने दहा दिवसात या प्रकरणात निर्णय दिला.
मालक मुलींना घेऊन घरी आला असता आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. पत्नीला रुग्णालयात दाखल करतानाच ती मृत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान कामगाराच्या अंगावर देखील प्रतिकार करताना झालेल्या जखमा होत्या. ही जखम नेमकी कशी झाली असे त्याच्या मित्राने विचारले असता त्या बाईचा खून करताना तिने प्रतिकार केला आणि माझ्या अंगावर या जखमा झाल्याचे मनोरंजनने सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी कंपनी मालकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. कंपनी मालकाच्या घरासमोर राहत असलेला कामगार मनोरंजन महाकुड घरात नसल्याचे आणि तो उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती कंपनी मालक आणि पोलिसांना मिळाली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मनोरंजनची कसून चौकशी केली. त्याने कंपनी मालकाच्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. कंपनी मालकाची पत्नी आणि आपले प्रेमसंबंध होते असे सांगत तिचे आणखी कोणाबरोबर तरी संबंध असल्याचा मला संशय होता. म्हणून मी खून केल्याचे त्याने सांगितले. तसेच खून करताना तिने केलेल्या प्रतिकराच्यावेळी मला या जखमा झाल्या, असे देखील त्याने नमूद केले.