नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशात मे महिन्यात वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात ( GST collection ) एप्रिल महिन्याच्या तुलनेत १६.६% घट झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी दिली. दिलासादायक बाब म्हणजे मे-२०२१ च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार गेल्या महिन्याभरात १ लाख ४० हजार ८८५ कोटी जीएसटी संकलन झाले. हा आकडा गेल्या दोन महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा कमी आहे.
एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे विक्रमी १.६८ लाख कोटी जीएसटी संकलन करण्यात आले होते. तर, मार्च २०२२ मध्ये जीएसटी संकलन १.४२ लाख कोटी राहीले. मे महिन्याच्या एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) २५ हजार ३६ कोटी रूपये राहील. राज्य जीएसटी (एसजीएसटी) संकलन ३२ हजार १ कोटी रूपये आणि एकीकृत जीएसटी (आयजीएसटी) संकलन ७३ हजार ३४५ कोटी रूपये राहीले. शिवाय १० हजार ५०२ कोटी रूपये उपकर स्वरूपात संकलित करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली.
मार्च महिन्यापासून सातत्याने जीएसटी संकलन १.४० लाख कोटींहून अधिक राहीले आहे. मे-२०२१ च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे.मे २०२१ मध्ये ९७ हजार ८२१ कोटी जीएसटी संकलन झाले होते.जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर चौथ्यांदा मासिक जीएसटी संकलन १.४० लाख कोटींहून अधिक झाले आहे.
१) जानेवारी १,४०,९८६ १८%
२) फ्रेब्रुवारी १,३३,०२६ १८%
३) मार्च १,४२,०९५ १५%
४) एप्रिल १,६७,५४० २०%
५) मे १,४०,८८५ ४४%