नाशिक : जिल्हा रुग्णालयात आढळल्या तीन बोगस डॉक्टर | पुढारी

नाशिक : जिल्हा रुग्णालयात आढळल्या तीन बोगस डॉक्टर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात तोतयेगिरीच्या संशयावरून तीन महिलांना मंगळवारी (दि. 5) पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित तिन्ही महिला डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णालयात वावरत असताना त्यांचे सुरक्षा रक्षकांसोबत खटके उडाल्याने तोतयेगिरीचा प्रकार उघडकीस आला. मात्र, दिवसभर शहरात बोगस महिला डॉक्टरांचा जिल्हा रुग्णालयात संचार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून तीन महिला तोतयेगिरी करीत असल्याची तक्रार आल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांना ताब्यात घेतले. चौकशीत संशयित तिघींपैकी एकीने नर्स असल्याचा दावा केला. तसेच तिच्या पर्समध्ये स्टेथॅस्कोप आढळून आला. उर्वरित दोघींकडे ओळखपत्र अथवा इतर पुरावा न मिळाल्याने पोलिसांकडे धाव घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारवाडा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ताब्यात घेतल्या महिलांपैकी एकीची तब्येत खालावल्याने तिची वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकशीअंती कठोर कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button