डोंबिवली : परिवहन कर्मचारी पगारापासून वंचित तर पालिकेचे उत्पन्न वाढवण्याकडे दुर्लक्ष | पुढारी

डोंबिवली : परिवहन कर्मचारी पगारापासून वंचित तर पालिकेचे उत्पन्न वाढवण्याकडे दुर्लक्ष

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान :  कल्याण – डोंबिवली महापालिकेचे परिवहन कर्मचारी गेल्या दोन महिने पगारापासून वंचित आहेत. तसेच पालिकेतील इतर अधिकाऱ्यांचे पगार जर वेळेत होत असतील तर परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार का वेळेत दिला जात नाही ? असा सवाल महापालिकेचे कर्मचारी, कामगार सेनेचे सरचिटणीस रवी पाटील यांनी केला आहे.

तसेच, परिवहन कर्मचाऱ्यांचे पगार वर्षाला 3 कोटी आहे. परंतु अर्थसंकल्पात केवळ 2 कोटी इतकीच तरतूद करण्यात आली आहे. आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना पालिकेकडून केली जात नाही. असेही निदर्शनास येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत 550 कर्मचारी काम करतात. मात्र सध्या केवळ 15-16 बसेस रस्त्यावर धावत आहेत. आणि त्‍यांच्या दिवसभरात फक्त ५० फेऱ्या होतात. दिवसाला 5 ते 7 लाख रुपये उत्पन्न होत होते. परंतु आता ते केवळ एक ते सव्वा लाखांवर आले आहे. इतकेच नव्हे तर 140 बसेस तांत्रिक अडचणीमुळे बंद असून या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कोणत्याही संस्थेची नेमणूक अद्याप पर्यंत करण्यात आली नव्हती. जवळपास सहा महिने ही फाईल या विभागातून त्या विभागाकडे फिरवली जात होती.

दरम्‍यान, आता ही फाईल मंजूर झालेली आहे. तरी मागील सहा महिने पालिकेने परिवहन विभागाचे नुकसानच केले आहे. आयुक्तांना कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात विचारले असता सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला असून लवकरच कामगारांना पगार मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. मात्र अधिकाऱ्यांचे पगार तुम्ही वेळेत देता मग या कर्मचाऱ्यांना पगार का वेळेत देत नाही, असा सवाल रवी पाटील यांनी आयुक्‍तांना केला.

विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात परिवहनच्या जवळपास 200 कर्मचाऱ्यांना कोव्हिडची कामे करण्यासाठी परिवहन विभागातून पालिकेच्या इतर विभागात वर्ग केले. मात्र अद्यापही हे कर्मचारी इतर विविध विभागात काम करत असून त्यांना देखील पगार देण्यात आलेला नाही. तसेच, पालिका बिर्ला कॉलेज रिंग रुट, नवी मुंबई , पनवेल, भिवंडी या गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या रूटवर परिवहनची सेवा का देत नाही असे ही ते म्‍हणाले.

हेही वाचलं का  

Back to top button