कृषी विद्यापीठांना पांढरा हत्ती म्हणणे करते व्यथित   | पुढारी

कृषी विद्यापीठांना पांढरा हत्ती म्हणणे करते व्यथित  

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आंदोलनातून निर्माण झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला चांगली परंपरा असून, येथे घडलेले अनेक विद्यार्थी विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी सुरुवातीस प्राधान्य असलेल्या विद्यापीठाच्या कक्षा अधिक रुदांवल्या असल्या तरी कृषी विद्यापीठांना पांढरा हत्ती म्हणण्याने मन व्यथित होते अशी खंत या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली. असे म्हणणार्‍यांचा आपण सर्वांनी धिक्कार करायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Microplastics in body : धक्कादायक! मानवी रक्तात प्रथमच सापडले प्लास्टिकचे कण

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (1972 ते 2022) सुवर्ण महोत्सवी संमेलन साखर संकुल येथील सभागृहात गुरुवारी (दि.24) सकाळी त्यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनास सुमारे 60 हून अधिक पुणेस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी माधवराव सानप, डॉ. विनायक पवार, डॉ. कृष्णा लव्हेकर, डॉ. किसनराव गोरे, माधवराव सांगळे, सतिश देशमुख, पांडुरंग जाधव, डॉ. अजित चंदेले, गोविंद हांडे, डॉ. जयंत टेकाळे, दशरथ तांभाळे, पांडुरंग शिगेदार, डॉ. रामकृष्ण मुळे यांच्यासह साखर आयुक्त शेखर गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

अजित पवारांचे चिरंजीव उर्वशी रौतेलासोबत दिसल्याने चर्चांना उधाण ! फोटो व्हायरल

सिंहावलोकन करणे महत्त्वाचे

विद्यापीठाला 50 वर्षे पूर्ण होणे हा एक मोठा कालखंड असून, त्याचे सिंहावलोकन करणे महत्वाचे आहे. या निमित्ताने आज माजी विद्यार्थ्यांच्या मांडलेल्या सूचनांचा मी आदर करतो, असे नमूद करुन ढवण म्हणाले, कृषी विद्यापीठांच्या समस्यांचा कोणी विचार करीत नाही. मंजूर पदाच्या 45 टक्के एवढ्या मर्यादित मनुष्यबळावर काम चालले असून, 10 ते 20 टक्के लोक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. विद्यापीठाचे मानांकन खाली येण्यामागे काही कारणे आहेत. दर्जेदार माणसे नाहीत हा कृषी विद्यापीठाचा दोष आहे काय? कृषी परिषदेची आजची अवस्था काय आहे? मागील तीन वर्षात शासनाकडून विद्यापीठाला एक पैसा आला नाही. आमच्या उत्पन्नातील खर्चांसही आम्हांला शासन मंजुरी मिळत नसल्याचे ते म्हणाले.

कंगना, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मी हक्कभंग आणला म्हणून माझ्यावर कारवाई : प्रताप सरनाईक

माजी कुलगुरु किसनराव गोरे म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाकडून संशोधित वाण संपुर्ण जगभर पोहोचले आहेत. मात्र, संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ महत्वाची आहे. कृषी विद्यापीठाने नवीन संशोधनास दिशा देण्याचे काम करावे. माधवराव सांगळे म्हणाले, मराठवाडा कृषी विद्यापीठ स्वतंत्र स्थापन करण्यासाठी आंदोलन झाले. विद्यापीठात सुसज्ज अशी लायब्ररी ठेवून शेतकर्‍यांच्या मुलांना मार्गदर्शन करण्यात यावे. अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
प्रास्तविक माधवराव सानप, सूत्रसंचालना डॉ. एम.जी. लांडे तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्णा लव्हेकर यांनी मानले.

Back to top button